संपत ढोली ः सकाळ वृत्तसेवा
सिन्नर : खरीप हंगामात कमी दिवसांत जास्त उत्पन्न देणारे कांद्याचे नवीन वाण विकसित करण्यात नाशिकच्या राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्राला यश आले आहे. तब्बल १० वर्षे त्यासाठी संशोधन सुरू होते. विशेष म्हणजे भारतातील कांदा उत्पादक कोणत्याही राज्यात याचे उत्पादन घेता येणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या वाणाला मान्यता दिली असून, लवकरच त्यास नाव देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर विशेष बैठक होईल.
उत्पादन हेक्टरी ३०० ते ३५० क्विंटलपर्यंत येत असल्याचा दावाही शास्त्रज्ञांनी केला आहे. केंद्रातर्फे या अगोदर १९८७ मध्ये ॲग्रो फाउंड डार्क रेड वाण विकसित करण्यात आले होते. त्यानंतर संशोधित झालेले खरिपासाठी हे दुसरे वाण आहे. केंद्राचे प्रकल्पप्रमुख डॉ. मनोजकुमार पांडे, केंद्रप्रमुख डॉ. सुजय पांडे, सिन्नर केंद्राचे सचिन चौधरी, डॉ. नितीश शर्मा, डॉ. जस्ती श्रीवर्षा यांनी त्यासाठी मेहनत घेतली.
या वाणाची विक्रीही येत्या १५ मे ते १५ जूनदरम्यान सिन्नर व निफाड तालुक्यांतील चितेगाव व कुंदेवाडी येथे सुरू होणार आहे. पावसामुळे उत्पादनात घट येण्याची धास्ती शेतकऱ्यांत असल्याने खरिपात कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा फारसा कल नाही. मात्र, नवीन वाण सर्व शंकांना छेद देणारे आहे.
देशभराचा विचार केल्यास नाशिकचा उन्हाळ कांदा बाजारात येण्यापूर्वी उपलब्धतेत मोठी तफावत निर्माण होते. ती दूर करण्याबरोबरच खरिपातील कांद्याचे उत्पादन वाढविण्याचा उद्देश संशोधकांनी समोर ठेवला होता. त्यात यश आले. शिवाय, हे वाण महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेशचा काही भाग यासह इतर उत्पादित राज्यांत लागवड करता येणारे आहे.
नवीन विकसित वाणाचे विशेष
(तात्पुरते नाव ः कॉल ८८३)
रंग ः हलका लाल
उत्पादन कालावधी ः ८० दिवस
हेक्टरी उत्पन्न ः ३०० ते ३५० क्विंटल
यापूर्वीचे ॲग्रो फाउंड वाण
रंग ः गर्द लाल
उत्पादन कालावधी ः ९० ते १०० दिवस
हेक्टरी उत्पन्न ः २५० ते ३०० क्विंटल
''विकसित केलेले कांद्याचे वाण इतर वाणांच्या तुलनेत खरिपासाठी शेतकऱ्यांना फायद्याचे आहे. याशिवाय, बाजारातील उन्हाळ कांद्यापूर्वीची उपलब्धतेतील तूट यामुळे भरून निघेल. शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणारी ही बाब आहे.''- मनोजकुमार पांडे, प्रकल्पप्रमुख, राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्र