नागपूर : मंगळवारपासून शाकंभरी नवरात्र प्रारंभ होत असून, दुर्गाष्टमीसुद्धा आहे. हा अत्यंत शुभ दिवस असून, या दिवशी योगायोगाने नागपूरच्या अवकाशात आपल्याला डोळ्यांनी नवग्रहांपैकी काही महत्त्वाच्या ग्रहांचे दर्शन प्रत्यक्ष घेता येणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल नागेश वैद्य यांनी दिली आहे.
डॉ. वैद्य यांच्या मते, मंगळवारी दुपारी ४.२८ वाजता अष्टमी संपून, शुक्ल पक्षाच्या नवमीचा प्रारंभ होणार आहे. या दिवशी नागपूरकरांना अनोखी खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. सायंकाळी सात वाजता अवकाशात सात ग्रहांचे दुर्मीळ दर्शन एकावेळेस होऊ शकेल.
याशिवाय पश्चिमेच्या बाजूला अवकाशात शुक्राची चमकदार चांदणी पाहायला मिळेल. तसेच चांदणीच्या थोडे वर शनि महाराज त्यावर जवळच नेपच्यून ग्रह स्पष्टपणे दिसणार आहे. आकाशात मध्यभागी अष्टमीचा अर्धचंद्र मीन राशीतला तसेच पश्चिमेला कुंभ व मकर राशी मावळतीला राहील.
तर पूर्व बाजूला सध्या वक्री असलेला युरेनस मेष राशीतला दिसून येईल. त्यामुळे पूर्व दिशेला पाहिल्यास लाल रंगाचा मंगळ कर्क राशीत आपल्याला सहज दर्शन देणार आहे. नेहमी दिसणाऱ्या ध्रुवताऱ्याच्या आजूबाजूला ताऱ्यांचा प्रश्नचिन्हसारखा दिसणारा समूह हा सप्तऋषी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ज्याप्रमाणे आपण चंद्र नेहमीच पाहतो, त्याप्रमाणेच काही ग्रहांचे सुद्धा चंद्र असतात.यावेळी साध्या डोळ्यांनी त्या बाजूला चमकणारे जे तारे दिसतील, ते गुरू ग्रहाचे काही चंद्रच आहेत. परंतु गुरुचे इतर चार चंद्र मात्र दुर्बिणीच्या साहाय्यानेच पाहता येतील, असेही डॉ. वैद्य म्हणाले. अशाप्रकारे तारांच्या समूहाचे दर्शन एकावेळेस होणे, हा दुर्मीळ योग असून, ढगाळ वातावरण नसल्यास या घटनेचा सर्वांनी आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. अनिल वैद्य यांनी नागपूरकरांना केले आहे.