पिंपरी, ता. ७ ः एंड्युरेन्स ॲथलिट असोसिएशनच्यावतीने लहान मुलांसाठी देशातील पहिली खुली जलतरण (ओपन वॉटर) ट्रायथलॉन स्पर्धा नुकतीच भरविण्यात आली. या स्पर्धेत पायल पाटील हिने दुहेरी मुकूट पटकाविला. अन्य गटांत आर्य धोत्रे, अनाबिया शेख, शार्विल देशमुख, शशांक बुटकुदी, अनन्या उपाध्याय आदींनी विजेतेपद मिळविले.
आंदर मावळातील आंद्रा धरणात कोंडीवडे पूलाजवळ ही स्पर्धा झाली. पहिल्या टप्प्यात ४ जानेवारीला लहान मुलांसाठी; तर दुसऱ्या दिवशी १२ वर्षांवरील मुलांसह महिला आणि पुरुष गटात स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी स्थानिक जागा मालक शेखर मालपोटे, अरुण्यमचे संस्थापक गणेश काकडे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे, नाईट रायडर्स, रोटरी चिंचवड, राष्ट्रीय लाइफ सेविंग सोसायटी, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपी आणि अन्य विविध संस्थांनी स्पर्धेला मदतीचा हात दिला. एंड्युरेन्स ॲथलिट असोसिएशनचे अध्यक्ष विश्वकांत उपाध्याय, कोअर कमिटीतील सदस्य यतीश भट, श्रीराम राय, वैभव ठोंबरे, सुनील भिसे, परितोष मोहिते, आर्यन उपाध्याय, मोनिका जोशी, कोकी व्हेन डॅम आदींनी संयोजन केले. एंड्युरेन्स ॲथलिट असोसिएशन ही एक सामाजिक संस्था असून ट्रायथलॉन क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देणे आणि गुणवान ऍथलेटसना पाठबळ देणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे.
स्पर्धेतील विजेते प्रथम, द्वितीय, तृतीय यानुसार :
८ ते १० वर्षे (मुले) - आर्य धोत्रे, पार्थ रोंगे, रिशुल घोळवे. मुली - अनाबिया शेख, सिया कुलकर्णी, सावनी शाळिग्राम. १० ते १२ वर्षे - शार्विल देशमुख, आराध्य गलगली, अनुज देवकर. मुली - पायल पाटील,
श्रावणी कुलकर्णी, तन्या भट्टाचार्य. सुपर स्प्रिंट ट्रायथलॉन (महिला) : पायल पाटील, ओजस्वी कुलकर्णी,
क्लेअर जॉन्सन. पुरुष - शशांक बुटकुदी, अनंत कडू, यश जगदाळे. स्प्रिंट ट्रायथलॉन (महिला): अन्यया उपाध्याय, कोहिनूर दर्डा, तन्वी काळे. पुरुष : मंगेश कडू, विनायक अवस्थी, अनिश नथानी. ऑलिंपिक डिस्टन्स ट्रायथलॉन (महिला) : कोकी व्हेन डॅम, प्रीती नारायण.
पुरुष - हर्ष यादव, सचिन वाकडकर, आर्यन घुगे.
ट्रायथलॉनमधील नवा आयाम...
चार जानेवारीला लहान मुलांची झालेली ओपन वॉटर ट्रायथलॉन देशातील पहिलीच स्पर्धा ठरली. कारण, याआधी ओपन वॉटर ट्रायथलॉन स्पर्धा लहान मुलांसाठी कधीही आयोजित केली गेली नव्हती. या ऐतिहासिक स्पर्धेत लहान मुलांनी उत्साहाने भाग घेतला आणि ट्रायथलॉन स्पोर्ट्सच्या क्षेत्रात एक नवा टप्पा गाठला.
PNE25U78729, PNE25U78732