खारघर, ता. ७ (बातमीदार) : गेल्या काही महिन्यांत सोनेरी कोल्ह्यांच्या वावरामुळे त्रस्त झालेले खारमधील नागरिक पुन्हा एकदा भयभीत झाले आहेत. खारघर टेकडीवरील फणसवाडी, चाफेवाडी ग्रामस्थांना गेल्या आठ दिवसांत अनेक वेळा बिबट्या दिसून आल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. वन विभागाकडून ठोस उपाययोजना करून बिबट्यांना बंदिस्त करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
खारघर डोंगरावर गेल्या १५ वर्षांत वन विभागाकडून वृक्ष लागवड करण्यात आली आहे, तसेच झाडे तोडणाऱ्यांवर वन विभागाकडून कारवाईही केली जात आहे. येथे मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, झाडे मोठी झाल्यामुळे घनदाट जंगलाचे जाळे पसरले आहे. विशेष म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खारघर, नवी मुंबई, रोहिजण आणि मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. कामाच्या खडखडाटामुळे आश्रयासाठी बिबट्या, कोल्हा आदी वन्यजीव डोंगरावरील जंगलात वास्तव्य करीत असावेत, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, खारघर डोंगरावरील फणसवाडी, चाफेवाडी पाड्यांतील नागरिक खारघर आणि नवी मुंबई महापालिकेत सफाई कामगार, तसेच काही नागरिक नवी मुंबई आणि खारघर परिसरात अनेक ठिकाणी रोजंदारीवर काम करीत असल्यामुळे दुचाकी, तसेच पायवाटेने ये-जा करावे लागत आहे. काही कामगारांना रात्रपाळीवर जावे लागत आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत पाड्यातील ग्रामस्थांना चाफेवाडीकडून फणसवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडताना बिबट्या दिसून आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून ठोस उपाययोजना करून बिबट्यांना बंदिस्त करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
-------------------
एकटे जाऊ नये
सीबीडी परिसरातील बहुतांश नागरिक हे सकाळ-संध्याकाळ खारघर डोंगरावर जाणाऱ्या रस्त्यावर चालण्यासाठी जात असतात. सुट्टीच्या दिवशी खारघर, तळोजा परिसरातील नागरिक पांडवकडा आणि सेक्टर ३५लगत असलेल्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी जात असतात. डोंगरावर बिबट्या निदर्शनास आल्यामुळे नागरिकांनी एकटे न जाता मित्र, कुटुंबासोबत जावे, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.
--------------------
सीसीटीव्हीत कैद
सीबीडी सेक्टर पाच येथील आरबीआय कॉलनी शेजारी डोंगरावर जाणाऱ्या रस्त्यावर सिडकोने सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. सुरक्षा रक्षकांच्या खोलीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला आहे. रविवारी (ता. ५) रात्री अकराच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी बिबट्या जवळून पाहिल्याचे ‘सकाळ’ला सांगितले.
-----------------
खारघर डोंगरावर साळींदर, डुक्कर आदी प्राणी आहेत. त्यात गेल्या आठवड्यात पिल्लांसह बिबट्या निदर्शनास आला आहे. वन्यजीवांचे रक्षण करणे आपली जबाबदारी आहे. बिबट्या निदर्शनास आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने पाड्यातील ग्रामस्थांना भेटून माहिती घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.
- संजय घरत, माजी सरपंच, बेलपाडा
------------------------
डोंगरावर बिबट्या असल्याचे ग्रामस्थांकडून समजले. वन विभागाचे कर्मचारी सायंकाळी गस्त घालत आहेत; मात्र आम्हाला बिबट्या अद्याप दिसून आला नाही. निदर्शनास येताच योग्य ती उपाययोजना केली जाईल.
- गजानन पांढरपट्टे, वन परिक्षेत्र अधिकारी, पनवेल