उरणमध्ये ४५ हजार वाहनचालकांना दंड
esakal January 08, 2025 12:45 AM

उरण, ता. ७ (वार्ताहर) : उरण वाहतूक शाखेने रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने वर्षभर विशेष मोहीम राबवली. त्याचबरोबर वाहन अपघातांना आळा घालण्यासाठी जानेवारी ते डिसेंबर २०२४पर्यंत मोटर वाहन कायद्याखाली ४५ हजार ४६८ वाहनचालकांविरुद्ध विविध कलमांखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन कोटी ८० लाख ८५ हजार ९५० रुपये दंड आकारण्यात आला असून, यापैकी २७ लाख ११ हजार ६०० रुपयांची वसुली करण्यात आली.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तसेच पोलिस रायझिंग डे व रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने उरण वाहतूक शाखेच्या वतीने विशेष उपक्रम राबवण्यात आले. त्याअंतर्गत उरण शहर व द्रोणागिरी, नवघर, भेडखळ परिसरात प्रबोधनपर कार्यक्रम, विशेष नाकाबंदी व तपासणी मोहीम आखण्यात आली आहे. कोणत्याही वाहनचालकाने मद्यप्राशन करून वाहन चालवू नये व मद्य प्राशन करून वाहन चालविताना आढळून आल्यास संबंधित वाहनचालकाविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाईसोबतच त्याचे वाहन जप्त अथवा वाहन परवाना निलंबन कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
-------------
झालेल्या कारवाया
रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी वाहने पार्क करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या २० हजार ८१३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या चार हजार ७४१ चालकांविरुद्ध, चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट न वापरलेल्या १२ हजार ३१९ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच ड्रंक ॲण्ड ड्राइव्हअंतर्गत १३२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
---------------
उरण शहर परिसरातील वाहनचालकांनी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर वाहने चालवताना स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोटर वाहन कायद्याचे पालन करावे. नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.
- अतुल दहिफळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.