रायगडमध्ये पोलिस रायझिंग डे उत्साहात
esakal January 08, 2025 12:45 AM

रायगडमध्ये पोलिस रायझिंग डे उत्साहात
अलिबाग, ता. ७ : स्वयंसिद्धा संचालित स्पर्धा विश्व अकॅडमीमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच पोलिस रायझिंग डे व सप्ताहअंतर्गत विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाकरिता अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर साळे, ॲड. निहा राऊत, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तथा स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी व इतर पोलिस कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांनी केले. तद्नंतर पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी उपस्थित स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना पोलिस रायझिंग डेचे महत्त्व तसेच हा दिवस साजरा करण्यामागच्या हेतूसंदर्भात माहिती दिली. जनता आणि पोलिस यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण व्हावे, पोलिसांविषयी वाटणारी भीती कमी व्हावी तसेच पोलिस हे जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात, असे सांगितले. तसेच सध्या बदलत चाललेल्या कायद्यांचे स्वरूप, जुन्या कायद्यांमध्ये झालेले बदल, नवीन कायदे कसे उपयुक्त ठरतात, गुन्ह्यांचे बदलणारे स्वरूप, अलीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये होत चाललेली वाढ व त्यातून होणारे फसवणुकीचे प्रकार रोखण्याकरिता काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी माहिती दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.