नाशिक : सिडकोतील महाकाली गार्डन येथे टोळक्याला रात्री उद्यानात मनाई केली असता संशयित टोळक्याने वॉचमनला धक्काबुक्की केली. त्यानंतर कोयते, लोखंडी रॉड घेऊन आलेल्या टोळक्याने राडा घालत उद्यानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडत नुकसान करून दहशत पसरवली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहिद खाटीक, सादीक खाटीक, यश वर्मा, गोलू मोरे, अमन शेख, पंकज इशी, मारी, प्रेम नाड्या, दूर्गेश सोनवणे, आकाश पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शिवाजी सोनू आहिरे (६८, रा. साईबाबा नगर, महाकाली चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या १७ डिसेंबर रोजी रात्री ९च्या सुमारास आहिरे गार्डनचे गेट बंद करीत असताना संशयित टोळके आले. त्यांनी आहिरे यांना धक्काबुक्की करीत ढकलून दिले. त्यानंतर संशयित रात्री ११ वाजता हातात कोयते, लोखंडी रॉड घेऊन पुन्हा आले.
त्यांनी मनपाने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडत लाखाचे नुकसान केले. तसेच, हातात शस्त्र फिरवत आहिरे यांना बाहेर येण्यासाठी आवाज देत तुझा गेमच करतो अशी धमकी देत होते. यावेळी संशयितांनी दगडफेकही केली असता, परिसरातील नागरिक जखमी झाले. परंतु संशयितांनी दहशत पसरविल्यान सारे लपून बसले होते. याप्रकरणी आहिरे यांनी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखविले असता, त्यात संशयितांची ओळख पटविण्यात आली. त्यानुसार अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक बागुल हे तपास करीत आहेत.