द्रमुकने राज्यपाल रवी यांच्यावर निशाणा साधला आहे
Marathi January 08, 2025 03:24 AM

मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या संयमालाही मर्यादा : कनिमोझी

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूत स्टॅलिन सरकार आणि राज्यपाल आर.एन. रवि यांच्यातील वाद वाढत चालला आहे. राज्यपाल विधानसभा अधिवेशनातून नाराज होत निघून गेल्याप्रकरणी द्रमुकने राज्यभर निदर्शने केली आहेत. राज्यपालांनी अभिभाषण न वाचल्याप्रकणी द्रमुकने त्यांची निंदा केली आहे. केंद्र सरकारने रवि यांना  तामिळनाडूचा राज्यपाल द्रमुक सरकारला त्रास देणे आणि तमिळांचा अपमान करण्यासाठी केले आहे. आमचे नेते स्टॅलिन यांच्या संयमालाही मर्यादा असल्याचे वक्तव्य द्रमुकच्या खासदार कनिमोझी यांनी केले आहे.

राज्यपालाचे पद राजकारण करण्यासाठी नाही. राज्यपाल विधानसभेला संबोधित करण्यास इच्छुक नसतील तर ते सुटीवर जाऊ शकतात. राज्यपालांनी तिसऱ्यांदा विधानसभेचा अपमान केला आहे. सी.एन. अण्णादुरई आणि एम. करुणानिधी यासारख्या नेत्यांकडून तयार करण्यात आलेले द्रमुक सदस्य मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वात लवकरच राज्यपालांकडून निर्माण करण्यात आलेले सर्व अडथळे दूर करतील. राज्यपालांना परत पाठविण्याचा दिवस आता फार दूर नाही असे कनिमोझी म्हणाल्या.

राज्यपालांकडून परंपरेचा भंग : भारती

राज्यपालांचा अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय राज्यातील पाच दशकांची परंपरा तोडणारा आहे. अभिभाषण न वाचण्यासाठी ते कारणं देत आहेत. त्यांच्याकडे बहिष्कारासाठी कुठलेही समर्पक कारण नाही. भाजप राज्यात यश मिळवू शकत नसल्याने राज्यपाल अशाप्रकारे वागत असल्याचा आरोप द्रमुकचे संघटन सचिव आर.एस. भारती यांनी केला आहे.

भाजपकडून द्रमुक लक्ष्य

राज्यपालांची निंदा केल्याप्रकरणी द्रमुकवर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष आणि आमदार वनथी श्रीनिवासन यांनी टीका केली आहे. राज्यपालांचा अपमान करण्याची सवय द्रमुकला जडली आहे. राज्यपाल विधानसभेत येताच द्रमुकचे सदस्य त्यांचा अपमान करू लागतात. राज्यपालांनी सोमवारी राष्ट्रगीतावर जोर दिला. द्रमुकचे सहकारी पक्ष सत्तेवर असलेल्या पश्चिम बंगाल आणि केरळमध्येही राष्ट्रगीत गायन होते. परंतु तामिळनाडूत वेगळी प्रक्रिया असल्याचे द्रमुकला वाटते अशी टीका श्रीनिवासन यांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.