मुंबई, दि. ७ : विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यामधे एमटीडीसीचे नवेगावबांध व भंडारा जिल्ह्यातील चांदपूर पर्यटक निवास पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.मंत्रालय येथील मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नवेगाव बांध व चांदपूर पर्यटक निवासाचा लोकार्पण सोहळा आभासी पद्धतीने झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक,पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.
नवेगाव बांध – एक आदर्श पर्यटनस्थळ
गोंदियापासून ६५ कि.मी.वर नवेगावबांध येथे राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे. वनश्रीने नटलेल्या या उद्यानाचा परिसर १६५ चौ.कि.मी. आहे. येथील तलाव व वनक्षेत्र पक्षांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथे सैबेरियासारख्या अतिदूर प्रदेशातून येणारे पक्षी विशिष्ट हंगामात दरवर्षी येतात. नवेगांवबांध हा तलाव ११ वर्ग कि.मी. परिसरात पसरलेला आहे.
नवेगावबांध सर्वसोयीसुविधा युक्त पर्यटक निवास
नवेगावबांध या पर्यटनस्थळी पर्यटकांना राहण्याकरिता महामंडळाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून २१ कोटींच्या निधीतून उत्तम सुविधेने सज्ज असलेले पर्यटक निवास चांदपूर या नावाने सुरू केलेले आहे. येथे व्हीआयपीसूट, डिलक्स सूट, स्टॅंडर्ड सूट आणि ८ बेडेड डॉर्मिटरी, उपहारगृह आणि मनोरंजनासाठी स्विमींगपूल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.येथे एकूण १८ सुट डिलक्स,२ लेडीज डॉरमेटरी सुट, जेन्ट्स डॉरमेटरी १ सूट,१ चेंजींग रूम,१ मॅनेजर रूम,१ वेटींग रूम आहे.
चांदपूर पर्यटक निवासाचे लोकार्पण
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून चांदपूर पर्यटक निवास हे पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील चांदपूर हे एक अत्यंत निसर्गरम्य आणि धार्मीक पर्यटन स्थळ आहे.चांदपूर या पर्यटन स्थळी पर्यटकांना राहण्याकरीता महामंडळाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून ११ कोटींच्या निधीतुन उत्तम सुविधेने सज्ज असलेले पर्यटक निवास चांदपूर या नावाने सुरू केलेले आहे. येथे डीलक्स सुटस्, डॉरमेंटरी, उपहारगृह आणि मनोरंजनासाठी स्विमींगपूल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. अशा एकूण २४ रूम आहेत.
चांदपूर लगत पर्यटन स्थळे
गायमुख येथे अंबागड टेकडीवरील प्राचीन शिवमंदिर प्रसिध्द आहे. आंबागड किल्ला हा भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असणारा सातपुडा पर्वत श्रणीतील डोंगरावर असलेला किल्ला आहे. बावनथडी नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याच्या ईशान्य सरहद्दीवरून जाणारी आणि गोंदिया जिल्हा व भंडारा जिल्हा या जिल्ह्यांतून वाहणारी नदी आहे. बावनथडी प्रकल्प (राजीवसागर) नावाचे धरण आहे.चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले, धापेवाडा हे सुंदर लोकप्रिय गाव असून पर्यटकांचे आकर्षण आहे.
००००
The post first appeared on .