कुठल्याही अरण्यकथेत होते, तशी नेपतीच्या झुडपात खसफस झाली. नेपतीचे झुडुप कसे दिसते, हे आता विचारु नका. ते जंगलात असते. उमरेड-पवनी- करांडला अभयारण्यात तर असतेच असते. तेथे साग, पळस, अर्जुन, हरडा, बेहडा, काटेसावरी अशा अगम्य नावांचे वृक्षही खूप आहेत. या अभयारण्यातील कुही वनक्षेत्रातील अशा वृक्षराजीमधूनच एक रस्ता गोठणगाव सफारी मार्ग या नावाने ओळखला जातो. त्या रस्त्यावरील ही अरण्यकथा. ऐकून तुमच्या हृदयाला पाझर फुटेल. डोळ्यात अश्रू येतील.
स्थळ : तेच... उमरेड-करांडला अभयारण्य गोठणगाव सफारी मार्ग.
वेळ : असेल सकाळची वगैरे.
आता तुम्ही म्हणाल, निबीड अरण्यात मार्ग कुठले? उद्या त्या सफारी मार्गावर ‘कै. जय वाघ चौक’ अशी पाटी लावाल!! (खुलासा : जय नावाचा एक ऐतिहासिक वाघ महाराष्ट्राच्या जंगलात होऊन गेला. तो प्रचंड लंबाचौडा होता, अशी वदंता आहे. असो.) पण अभयारण्यात रस्ते नसतील, तर त्यास नुसतेच जंगल म्हणतात. अभयारण्य म्हणत नाहीत.
...तर, ‘एफ-२’ नामक एक व्याघ्री आपल्या पाच बछड्यांसह सदरील मार्गावरुन निमूटपणाने चालली होती. आता हे अभयारण्यवाले वाघांना टी-१, टी-२, सी-एट, एफ-१, अशी नावे का देत असतील? जाऊ दे. लेकुरवाळी ‘एफ-२’माता आपल्या रस्त्याने मंडईला जात असताना अभयारण्यातील पर्यटकांच्या जिपा दोहो बाजूंनी येऊन उभ्या राहिल्या.
वाघांचीसुध्दा मंडई असावी! ‘साळिंदर सस्त्यात लाऽवलीऽऽ’, ‘ससा घ्या, ससाऽऽय,’ ‘आमचे येथे हरणाचे ताजे मटण मिळेल,’ अशा हाळ्याही ऐकू येत असतील. कुणाला ठाऊक?
जिपांच्या घेरावामुळे व्याघ्री आणि तिचे पाच बछडे यांना यूटर्नही घेता येईना, आणि पुढेही जाता येईना. जिपांमध्ये पन्नास-शंभर निसर्गप्रेमी टोप्या, गॉगल लावून उभे होतेच. समोर आयती वाघीण, तीही बछड्यांसह! शेकडो सेल्फ्या आणि फोटो निघाले. पर्यटकांचे फोटो काढून झाल्यावर जिपांनी वाघिणीस पुढे वाट दिली. अभयारण्य हे वन्यजीवांसाठी असते, अशी एक भ्रामक समजूत जगभर पसरलेली दिसते.
पण वस्तुत: अभयारण्य हे निसर्गप्रेमी, अरण्यवाचनविद्येच्या अभ्यासकांसाठी असते. तिथे वन्यजीव दुय्यम असतात. ‘एफ-२’ वाघिणीचा पर्यटकांनी केलेला ‘रास्ता रोको’ बेकायदा होता, असे लक्षात आल्याने माणसांच्या नागपूर येथील कोर्टाने प्रधान वनसंरक्षकांना धडाधड नोटिसा पाठवून जाब विचारला. दोन दिवसात चौकशी करुन जबाब द्या, असे कोर्टाने फर्मावल्याने प्र. व. संरक्षक तक्रार मागे घेण्याची विनंती करण्यासाठी ‘एफ-२’ वाघिणीच्या मागावर गेल्याचे समजते.
‘एफ-२’ मॅडमचा ताफा अडवल्यामुळे प्र. व. संरक्षकांची विभागीय चौकशी होणार असून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कारवाई का करु नये, अशी नोटिसही त्यांना देण्यात आल्याची बातमी जंगलभर पसरली आहे. या संपूर्ण प्रकरणात प्र. व. संरक्षकांची काहीही चूक नाही, असे प्रथमदर्शनी कुणाच्याही लक्षात येईल. चूक असलीच तर ती ‘एफ-२’ या व्याघ्रीचीच असावी.
मुळात लहान मुले (तीही पाच-पाच!) सोबत असताना रहदारीच्या रस्त्यावर फिरु नये, एवढा साधा सिविक सेन्स या बाईस कसा नाही? मुळात त्यांना एकदम पाच बछडे कसे झाले, याची निराळीच चौकशी व्हायला हवी!! च्यामारी, इथे दोन वाघ धड टिकत नाहीत, पाच-पाच बच्चे घेऊन या बाईसाहेब दिवसाढवळ्या राजरोस रस्त्यावर फिरतात, याला काय म्हणावे? प्र. व. संरक्षकांनी गोठणगाव सफारी मार्गावर धाव घेतली, आणि वाघीणबाईंचा कडका (पक्षी : चाहूल) घेत ते बसून राहिले. नेपतीच्या झुडपात खसफस झाली, ती त्यांचीच. दरवेळी शिकार किंवा फोटोग्राफी करायला थोडीच मचाणावर बसतात?