खासगी क्लासच्या आठ संचालकांविरोधात गुन्हा
esakal January 08, 2025 10:45 AM

खासगी क्लासच्या आठ संचालकांविरोधात गुन्हा

ठाणे, ता. ७ (वार्ताहर) ः आयआयटी आणि जेईईची शिकवणी देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची सव्वातीन कोटींची फसवणूक करणाऱ्या फिट जेईई इंजिनिअरींग क्लासेसच्या आठ संचालकांविरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ६) गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी फरार असून ठाणे नगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
जांभळी नाका बाजारपेठेतील प्रभात प्लाझा इमारतीत दुसऱ्या मजल्यावर फिट जेईई इंजिनिअरींग क्लासेस सुरू करण्यात आले होते. २०१३पासून या संस्थेमध्ये अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या पूर्व तयारीची (आयआयटी आणि जेईई) शिकवणी दिली जात होती. या संस्थेत एप्रिल २०२४ वर्षात २००हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. अकरावी आणि बारावी असे दोन वर्षांसाठी या संस्थेने विद्यार्थांकडून शुल्क स्विकारले होते. २५ नोव्हेंबरनंतर या संस्थेची पुण्यात असलेली शाखा काही तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आली. कालांतराने ठाण्यातील शाखेला घरघर लागली. पालकांनी जाब विचारताच संस्थाचालकांनी पाच हजार भरल्यास दिल्लीतील संस्थेतून ऑनलाइन शिकवणीचा पर्याय देण्यात आला; मात्र फसवणूक झाल्याने पालकांनी या पर्यायाला नकार देत ठाणे नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार क्लासच्या दिल्ली शाखेचा मुख्य संचालक डी. के. गोयल, राजीव बब्बर, मनीष आनंद यांच्यासह ठाणे शाखेच्या अनुज राठोड, विकास शर्मा, शरद शुक्ला, प्रशांत भगत आणि मुंबई शाखेचे मोहित सालढाणा या आठ जणांविरोधात तीन कोटी २० लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.