वर्षाच्या प्रारंभी काहीसे कष्टाचे योग आहेत. मात्र, त्यानंतर प्रगतीची घोडदौड सुरू राहील, फक्त त्यावर संयमाचा लगाम लावता यायला हवा.
-निखिल शेंडूरकर
Scorpio Horoscope Vruchik Rashi Bhavishya 2025 : वृश्चिक राशीचा राशिस्वामी मंगळ आहे. त्यामुळे यांच्या स्वभामध्येच मूलभूत धाडस असते. यंदाच्या वर्षाचा विचार करता हे वर्ष बहुतांश किरकोळ बाबी वगळता सुखकर जाईल, असे दिसते. वर्षाच्या प्रारंभी काहीसे कष्टाचे योग आहेत. मात्र, त्यानंतर प्रगतीची घोडदौड सुरू राहील, फक्त त्यावर संयमाचा लगाम लावता यायला हवा. नोकरीत नव्या जबाबदाऱ्या मिळण्याचे योग आहेत. वाहन वा स्थावर घेण्यासाठीही अनुकूल कालावधी दिसतो. आवक होईल; पण खर्चाचे प्रमाणही वाढेल. परदेशी जाण्याचे योग आहेत. (Health) दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. विवाहासाठी अनुकूल काळ आहे. नियमित साधना ठेवावी.
जानेवारी : वाहन खरेदीचा योग आहे. अपेक्षितांचे विवाह जुळून येण्याचे योग दिसतात. काही प्रमाणात मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. काळजी घ्यावी. सरकारी किंवा महत्त्वाची कामे दुसऱ्या पंधरवड्यात केल्यास हितकारक राहील. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. वाद वाढवू नये. काही जणांना पुत्र योग दिसत आहे. जमिनीशी संबंधित काम करणे टाळलेले बरे राहील. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. गोड बोलून कामे करा. कुणाच्या नजरेत वाईट होऊ नका. व्यवसायामध्ये नवनवीन कल्पना राबवाल. मोठी जोखीम टाळा.
महिलांचे खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढून मानसिक दडपण येण्याची शक्यता. मनःस्वास्थ्यासाठी योग आणि व्यायामावर भर द्या.
विद्यार्थ्यांना अध्ययनात काही अडचणी येऊ शकतात. अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो; मात्र तसे करून चालणार नाही.
अनुकूल दिवस ः१, २, ६, ७, ८, १४, १८, १९, २०, २१, २८, २९, ३०
फेब्रुवारी : इच्छुकांचे विवाह जुळून येण्याचे योग या महिन्यात आहेत. अष्टमस्थानी मंगळ आहे. भागीदारीचे व्यवहार करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कौटुंबिक सुख चांगले आहे. मुलांचे कौतुक होईल. महत्त्वाच्या कामात सुरुवातीला अडचणी येतील; पण कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग आहेत. मित्रमंडळींसोबत वेळ घालवू शकाल. नोकरीत वरिष्ठांना तक्रारीची संधी देऊ नका. इतर लोक सहकार्य करू शकतात. व्यवसायात आर्थिक लाभ उत्तम होण्याचे योग आहेत. संगीतादी कार्यक्रमामध्ये रस घ्याल.
महिलांना माहेरकडून एखादी शुभवार्ता कानावर येऊ शकते. करिअरच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नव्या संधी चालून येतील त्यांचा उपयोग करून घ्या.
विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल. एखाद्या प्रकल्पामध्ये चमूचे नेतृत्व करण्याची संधी लाभू शकते.
अनुकूल दिवसः २, ३, ४, ११, १५, १६, १७, २५, २६
मार्च : आध्यात्मिक उन्नतीचे योग आहेत. चांगल्या वाणीने अनेकांना प्रभावित कराल. विवाह, संततीचे योग दिसत आहेत. आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्यावी लागेल. एखादे आजारपण असल्यास सावधगिरी बाळगावी. नोकरीत चांगले वातावरण राहील. पगारवाढीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. धावपळ होईल; पण तुमच्या योजना यशस्वी झाल्याने आनंदी असाल. कामाच्या निमित्ताने लहान-मोठे प्रवासाचे योग आहेत. स्थावरसंबंधी विषयात वाद असल्यास तो तडजोडीने सोडवण्याचा प्रयत्न करणे हितकारक आहे.
महिलांना हा काळ सामान्य शुभ आहे. वडीलधाऱ्यांची काळजी घ्या. कामाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या, जेणेकरून वरिष्ठांना बोल लावण्याची संधी मिळणार नाही.
विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे; परंतु आहारावर नियंत्रण व अभ्यासात सातत्य ठेवावे लागेल.
अनुकूल दिवस :१, २, ३, १०, १४, १६, २४, २५, २६, २९, ३०, ३१
एप्रिल : मानसिक स्वास्थ्य कमी दिसते. कोर्ट कचेरीच्या कामात उशीर होईल. मोठे प्रवास करणे टाळलेले हितकारक आहे. लहान प्रवासाचे योग मात्र आहेत. या प्रवासादरम्यान एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणे तूर्तास पुढे ढकललेले बरे. घर जमीन खरेदी करू शकाल. गुरू महाराजांची कृपा राहील. नोकरीत शुभ घटना घडण्याचा काळ आहे. व्यवसायात भागीदाराशी सुसंवाद ठेवा. स्पर्धेला हलक्यात घेऊ नका. कुटुंबातील सदस्य विशेषतः मुलांच्या आरोग्याची चिंता सतावेल.
महिलांनी बोलताना काळजी घ्यावी. आपल्या बोलण्याने पुढील माणूस दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्यावी. सामाजिक प्रतिष्ठेची काळजी घ्या.
विद्यार्थ्यांसाठी काही प्रमाणात आव्हाने जाणवतील. अभ्यासाचा ताण वाढेल. विनाकारण खर्च टाळा.
अनुकूल दिवस ः६, १०, १२, २०, २१, २२, २५, २६, २७
मे : कौटुंबिक सुख बरे राहील. नोकरीमध्ये वातावरण आपल्या बाजूने राहील. आपली कामगिरीही चांगली असेल. व्यवसायात उत्तम काळ आहे. जितकी मेहनत घ्याल तितकी गोड फळे चाखायला मिळतील. व्यवसाय विस्तारीकरणाच्या दृष्टीने योजना आखू शकाल. प्राप्ती वाढणार आहे आणि खर्च सुद्धा. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची भेट होण्याचे योग आहेत. वाहन वा स्थावर घेण्याचे योग दिसतात. आरोग्य सामान्य राहील. भावंडांबरोबर एखादी ट्रिप घडू शकते. वातावरण आनंददायी आणि समाधानकारक राहील.
महिला एखादी नवीन वस्तू खरेदी करू शकतात दगदग जाणवेल. आई-वडिलांशी मतभेद संभवतात.
विद्यार्थ्यांसाठी सामान्य परिस्थिती आहे. अभ्यास वाढवावा. कुलदैवत व दुर्गा देवीची उपासना उपयुक्त ठरेल.
अनुकूल दिवस ः३, ४, ७, ८, १०, १६, १८, २४, २५, ३०, ३१
जून : काही प्रमाणात संघर्ष करावा लागेल; पण उन्नत्ती होईल. नोकरीत अधिकारात वाढ होईल. कुणावरही चटकन विश्वास ठेवू नका. व्यवसायात भरभराटीचे दिवस आहेत. विशेषतः भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होण्याचा काळ आहे. नोकरी सुरू ठेवून एखादा साइड बिजनेस सुरू करावयाचा असल्यास अनुकूल काळ आहे. व्यावसायिक सुद्धा नवीन व्यवसायात उतरू शकतात. गरीब, वृद्ध या लोकांची सेवा करण्याची इच्छा निर्माण होईल. त्या दृष्टीने पुण्यलाभ होईल. आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल.
महिला नवीन कार्याची सुरुवात करू शकतात. आर्थिक नियोजन करावे. कुटुंबात एखादे धार्मिक कार्य संपन्न होऊ शकेल. त्यातून मानसिक समाधान लाभेल.
विद्यार्थ्यांनी उत्साहाने अध्ययन करावे. संगत चांगली ठेवावी. अभ्यास गती घेईल, प्रगती होईल.
अनुकूल दिवस ः ४, ५, ६, १५, १६, १९, २०, २१, २७
जुलै : मुलाबाळांना समजून घेऊन त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा. पहिले पंधरा दिवस आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. धार्मिक कार्यात रस घ्याल. एखाद्या योगशिबिरात सहभाग घेण्याचे योग आहेत. या महिन्यामध्ये संपत्ती खरेदी करण्याचे पुढे ढकललेले बरे राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी सांभाळावी. व्यवसायात मोठी जोखीम न घेतलेली बरी. संयमित भाषेचा वापर करावा. बोलून वाद निर्माण होणार नाहीत, याची पदोपदी काळजी घ्यायला लागेल. यात्रेचे योग आहेत.
महिलांना मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदाराशी मतभेद संभवतात. निरुत्साह जाणवू शकतो. आवडत्या लोकांशी बोला, आध्यात्मिक बळ वाढवा.
विद्यार्थ्यांसाठी दिवस संघर्षाचे आहेत. आपल्या इष्टदैवताची आराधना करावी. मनस्वास्थ्य लाभेल.
अनुकूल दिवस ः१, २, ३, ११, १२, १३, १६, २४, २५, २८, २९, ३०, ३१
ऑगस्ट : हाती पैसा असेल, तर विचार करून सुरक्षित ठिकाणी गुंतवल्यास हितकारक ठरेल. महिन्याच्या उत्तरार्धात दूरची यात्रा घडण्याचे योग दिसतात. अष्टमात गुरू-शुक्र आहेत. भागीदारीच्या व्यवसायात अचानक धनलाभ संभवतो. नोकरीमध्ये सामान्य परिस्थिती राहील. नोकरीच्या ठिकाणी होत असलेल्या राजकारणात सहभागी होणे टाळावे. काही महत्त्वाच्या कार्यामध्ये उशीर संभवतो, संयम बाळगावा. आई-वडिलांच्या आरोग्याची चिंता सतावेल. त्यांची काळजी घ्या. नवीन स्थावर मालमत्ता घेण्यासाठी फारसा अनुकूल काळ नाही.
महिलांनी अति दगदग टाळा. शारीरिक श्रम वाढू शकतात. अतिउत्साहात आपल्या प्रकृतीला बाधेल असे कार्य न केलेले बरे. प्रकृतीची काळजी घ्यावी.
विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये अधिक जागरुक राहणे आवश्यक आहे. आळस टाळा, मेहनत घ्या.
अनुकूल दिवस ः७, ८, १२, १३, १४, २१, २५, २६, २७
सप्टेंबर : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणे तूर्तास पुढे ढकललेले बरे. गुरू महाराजांची कृपा राहील. प्रवासाचे योग आहेत. प्रवासात मौल्यवान गोष्टींची काळजी घ्या. गृहसौख्य फारसे नाही. वाद वाढवू नयेत. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. मित्रांकडून उधारी घेणे टाळा. नोकरीत हितशत्रूंकडून त्रास संभवतो. आपल्यावर आर्थिक जबाबदारी असेल, तर निष्काळजीपणा करू नका. व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. भागीदाराशी सुसंवाद ठेवा. गैरसमज व त्यातून वाद संभवतो.
महिलांना सामान्य शुभ काळ आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील, यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील, ताण-तणाव वाढणार नाही याची काळजी घ्या.
विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. एखादा पुरस्कार लाभू शकेल. संगत चांगली ठेवा.
अनुकूल दिवस - ४, ५, ६, ९, ११, १७, २१, २२, २३
ऑक्टोबर : थोड्या काळासाठी असेल; पण भाग्यस्थानी गुरू महाराज कर्क राशीत आहेत. हा गुरू आर्थिक दिशा देईल. पैसा जपून वापरावा. एखादा खर्च उद्भवू शकतो. व्यवसाय चांगला होण्याचे योग दिसतात. मोठा आर्थिक निर्णय घेताना सावधान. फार विचारपूर्वक निर्णय करावा. स्वतःचे आरोग्य जपावे. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. कामाचा व्याप वाढण्याची शक्यता दिसते. काही जणांना बढतीचे योग दिसतात. जवळच्या प्रवासाचे योग आहेत. मित्रमंडळींशी मतभेद संभवतात, वादात पडू नये. जमिनीशी निगडित जुना वाद उफाळून येऊ शकतो.
महिलांना मुलांचे सौख्य लाभेल. कुटुंबासाठी काही विशेष करून दाखवाल. धावपळ होईल; मात्र समाधान लाभेल.
विद्यार्थ्यांचे मन अभ्यासापेक्षा इतर गोष्टींकडे वळण्याची शक्यता आहे. मन विचलित होणार नाही, याची काळजी घ्या.
परीक्षेत चांगले यश मिळू शकेल. गणेशाची उपासना उपयुक्त.
अनुकूल दिवस ः१, २, ३, ६, ७, ८, १५, १८, १९, २०, २८, २९, ३०
नोव्हेंबर : बुध मानसिक अस्वास्थ्य देतील, असे दिसते. आर्थिक प्राप्तीचे योग आहेत. दशमातील गुरूची साथ असल्याने चिंता करण्याचे कारण नाही. तरीही प्राप्तीपेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. नोकरांशी संबंध ताणू नका. नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. किंचित संघर्ष करावा लागेल. विश्वासार्ह ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी योग्य काळ. कौटुंबिक समस्या सोडवाल. रागावर पूर्ण नियंत्रण ठेवावे. संपत्ती खरेदी करण्यासाठी महिन्याच्या सुरुवातीला प्रयत्न करावेत.
महिलांना सामान्य महिना राहील. भावंडांशी भेट होण्याचा योग दिसतो. जोडीदाराच्या आरोग्याविषयी चिंता जाणवेल. संपूर्ण कुटुंबाची काळजी तुम्हालाच घ्यावी लागेल.
विद्यार्थ्यांनी वेळ वाया न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. इतर बाबींकडे दुर्लक्ष करणे हितावह.
अनुकूल दिवस ः२, ३, ४, ११, १५, १६, १७, २५, २६, ३०
डिसेंबर : भाग्यातील गुरू महाराज अपेक्षितांचे विवाह ठरण्यास मदत करतील. एकमुखी दत्ताची उपासना उपयुक्त ठरेल. काही जणांना संततीयोग आहेत असे दिसते. अचानक धनलाभाचेही योग आहेत. नोकरीत अनुकूल वातावरण असेल. कामानिमित्त बाहेरगावी जावे लागू शकते. व्यावसायिकांना उत्तम व्यापार देणारा, भरभराट करणारा काळ आहे. हुशारी, संयम व मेहनत ही त्रिसूत्री अवलंबून यश पदरात पाडून घ्यावे. व्यस्तता वाढेल. नवीन संपत्ती खरेदीसाठी अनुकूल काळ. सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्या.
महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. दुखणे अंगावर काढणे त्रासदायक ठरू शकते. तातडीने औषधोपचार घ्यावेत आणि पथ्यपाणी जपावे.
विद्यार्थ्यांच्या मनात नाना प्रकारच्या शंका येतील. गुरुजनांचा आदर करा. नियमित योग करावा.
अनुकूल दिवस ः१, २, ८, १२, १३, १४, २२, २३, २४, २७, २८, २९