अहिल्यानगर : घरकाम येत नसल्याने व दुचाकी खरेदीसाठी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन येण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. मूळच्या खरगव्हाण (ता. आष्टी, जि. बीड) व सध्या माहेरी रुईछत्तिशी (ता. अहिल्यानगर) येथे राहात असलेल्या पीडित विवाहीतेने अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडितेच्या फिर्यादावरुन पती संतोष रामदास काळोखे, सासू पूनम रामदास काळोखे, कल्याणी रामदास काळोखे (सर्व रा. खरडगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी खरडगव्हाण येथे नांदत असताना २०२० ते जून २०२४ या दरम्यान ही घटना घडली आहे. तुला घरातील काम येत नाही, माहेरहून मोटारसायकल घेण्यासाठी ५० हजार रुपये आण, असे म्हणून फिर्यादीला वेळोवेळी शिवीगाळ करुन मारहाण करून घरातून हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.