Haldiram Temasek Deal: सिंगापूर सरकारची कंपनी टेमासेक लवकरच हल्दीराम स्नॅक्स फूड्समधील 10% हिस्सा खरेदी करू शकते. या हल्दीराम स्नॅक्सच्या हिस्स्याची किंमत सुमारे 10 अब्ज डॉलर्स आहे. हल्दीराम स्नॅक्स फूड्सचे मालक असलेले अग्रवाल कुटुंब आणि टेमासेक कंपनीने करार केला आहे. हल्दीराम स्नॅक्स फूड्स कंपनी दिल्ली आणि नागपूर येथील दोन कुटुंबे संयुक्तपणे चालवतात.
दोन्ही कुटुंबांनी मिळून ही कंपनी स्थापन केली होती. मनीकंट्रोलने दिलेल्या बातमीनुसार, हल्दीराम आणि टेमासेक यांच्यातील करार जवळपास अंतिम झाला आहे. हल्दीराममधील हिस्सा घेण्याच्या शर्यतीत बेन कॅपिटल आणि ब्लॅकस्टोनसारख्या अनेक गुंतवणूकदार कंपन्याही सहभागी झाल्या होत्या. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट फर्म ब्लॅकस्टोनलाही हल्दीराममधील स्टेक विकत घ्यायचा होता. पण त्याने कमी किंमत सांगितली होती.
या कराराचा अंतिम प्रस्ताव टेमासेक कंपनी महिनाभरात देणार आहे. जर हा करार झाला तर भारतीय बाजारपेठेतील ही सर्वात मोठी डील असेल. हल्दीराम स्नॅक्स फूड्सच्या मालकांना ही कंपनी लवकरच शेअर बाजारात लिस्ट करायची आहे.
या कराराबाबत टेमासेक कंपनीच्या प्रवक्त्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यावर स्नॅक्स फूड्सच्या मालकांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
टेमासेक कंपनीला आशा आहे की भारतात आरोग्य सेवा, कंझ्युमर ड्युरेबल आणि आयटी क्षेत्रात भरपूर वाव आहे. टेमासेक 2027 पर्यंत भारतात 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. टेमासेकला भारतात चार क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे. यामध्ये आरोग्य सेवा, कंझ्युमर ड्युरेबल, डिजिटलायझेशन आणि पर्यावरण संरक्षण हे प्रमुख क्षेत्र आहेत.
हल्दीराम ब्रँड गंगा बिसन अग्रवाल यांनी 1937 मध्ये सुरू केला होता आणि आज या कंपनीचा व्यवसाय अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. हल्दीरामची उत्पादने सिंगापूर, अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांमध्येही जातात. पोर्टफोलिओमध्ये 400 हून अधिक प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत. देशातील स्नॅक्स आणि नमकीन मार्केटमध्ये हल्दीराम पेप्सिको, आयटीसी, बिकानेरवाला फूड्स, बालाजी वेफर्स आणि पार्ले प्रॉडक्ट्स इत्यादी कंपन्यांशी स्पर्धा करत आहे.