Team India: रोहित-विराटचे भवितव्य निवड समितीच्या हाती, विचार करून संघनिवड करा, गावसकरांचा हल्लाबोल
esakal January 08, 2025 04:45 PM

Team India: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या मनात भविष्याबाबत इतर कोणताही विचार असला तरी त्यांचे भवितव्य निवड समितीच्या हाती आहे, तसेच गेल्या सहा महिन्यांतील संघाच्या घसरलेल्या कामगिरीचे खोलवर आणि प्रामाणिकपणे विश्लेषणही करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत विख्यात क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गावसकर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयश आणि त्याअगोदर मायदेशात न्यूझीलंडलविरुद्ध झालेल्या मानहानिकारक अपयशाचाही उल्लेख केला. अजित आगरकर अध्यक्ष असलेल्या निवड समितीने आता संघात स्थान मिळवण्यासाठी उंबरठ्यावर उभ्या असलेल्या खेळाडूंना न्याय द्यायला हवा, असेही गावसकर यांनी स्पष्ट केले.

सातत्याने अपयशी ठरत असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याबाबत विचारले असता गावसकर म्हणतात, ते अजून पुढे किती काळ खेळणार हे निवड समितीवर अवलंबून आहे. आता तर कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी आपण पात्र ठरलेलो नाही. त्यामुळे असे का घडले याचा शोध घ्यायला हवा.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाल्यापासून प्रथम भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला नाही. ऑस्ट्रेलियातील मालिका १-३ अशी गमावल्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले.

अंतिम सामना तर गाठू शकलो नाहीच. त्याचबरोबर दशकानंतर प्रथमच गावसकर-बॉर्डर करंडकही ऑस्ट्रेलियाकडे देण्याची वेळ आणली आणि हे प्रामुख्याने विराट कोहली व रोहित शर्मा या सर्वांत अनुभवी खेळाडूंच्या अपयशामुळे झाले.

कोहलीला पाच सामन्यांच्या मालिकेतील नऊ डावांत मिळून केवळ १९० धावा करता आल्या, तर रोहित शर्माने पाच डावांत मिळून अवघ्या ३१ धावा केल्या.

आपली फलंदाजी इतकी सुमार झाली की पाच कसोटींतील नऊ डावांपैकी सहा डावांत २०० धावांचा टप्पा पार करता आला नाही, याचाही उल्लेख गावसकर यांनी केला. गेल्या सहा महिन्यांपासून आपली फलंदाजी अपयशी ठरत आहे आणि पराभवास हेच प्रमुख कारण आहे, असे गावसकर म्हणाले.

सुनील गावसकरआता जूनच्या मध्यावर सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापासून कसोटी अजिंक्यपद मालिकेचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे. त्यामुळे २०२७ पर्यंत कोणते खेळाडू कायम राहू शकतील याचा विचार करून निवड समितीने आत्ताचाही संघ निवडावा. निवड समितीची जबाबदारी

गावसकर यांनी कोणत्याही नवोदित खेळाडूंची थेट नावे घेतली नाहीत, परंतु देशांतर्गत स्पर्धांमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली जात आहे, अशा खेळाडूंना संधी देण्याची जबाबदारी निवड समितीची आहे, अशा खेळाडूंचा आत्ताच विचार केला नाही, तर ते केवळ रणजी सामन्यांमध्येच चांगली कामगिरी करत आहेत की आंतरराष्ट्रीय स्तरावरही तितकाच उत्तम खेळ करू शकतील, हे समजणार नाही म्हणून योग्य आणि अचूक निवड ही निवड समितीची जबाबदारी आहे.

बुमरावरचा ताण कमी करा

गोलंदाजीबाबत बोलताना गावसकर म्हणाले, वेगवान गोलंदाजीत आपल्याकडे चांगली गुणवत्ता आहे. त्यांना योग्य वेळी आणि पुरेशी संधी द्यायला हवी. त्यामुळे जसप्रीत बुमरावरचा ताण कमी केला जाऊ शकतो.

आपण आपला चेहरा दररोज आरशात पाहातो, परंतु चेहऱ्यात होत असलेले बदल समजत नाहीत, परंतु जुनी छायाचित्र किंवा व्हिडिओ पाहतो तेव्हा चेहऱ्यांमध्ये झालेले बदल लगेचच लक्षात येतात आणि त्यानंतर आपण बदल करायला लागतो. भारतीय संघाबाबतही अशाच दीर्घ आणि प्रामाणिक नजरेने पाहण्याची गरज आहे, असे गावसकर म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.