अतुल सुभाष यांच्या आईला सुखावह नाही.
Marathi January 08, 2025 06:25 PM

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पत्नीने छळ केल्याने आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या करणाऱ्या बेंगळूरमधील अतुल सुभाष याच्या मातेला सर्वोच्च न्यायालयात, आपल्या नातवाचा ताबा मिळविण्यात अपयश आले आहे. अतुल सुभाष आणि त्याची पत्नी निकिता सिंघानिया यांना एक मुलगा असून त्याचा ताबा निकीता हिच्याकडे आहे. तथापि, निकीता हिच्यावर पती अतुल सुभाष याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. अशा वातावरणात मुलगा निकिता सिंघानिया हिच्याकडे सुरक्षित राहू शकत नाही, असे सुभाष याच्या आईचे म्हणणे होते.

या आत्महत्या प्रकरणात निकिता हिला तिच्या मातापित्यांसह अटक करण्यात आली होती. तथापि, बेंगळूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नुकताच या तीन्ही आरोपींना जामीन संमत केला आहे. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे अतुल सुभाष याच्या नातेवाईकांनी स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सुभाष याच्या मातेने नातवाचा ताबा मिळावा म्हणून केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात न्या. बेला एम. त्रिवेदी यांच्या नेतृत्वातील पीठासमोर सुनावणी झाली. तथापि, कायद्यातील नियमानुसार मुलाचा पिता नसेल तर त्याचा ताबा घेण्याचा अधिकार त्याच्या आईचा आहे. आजी ही कायद्याच्या दृष्टीने या मुलासाठी एक ‘अनोळखी’ व्यक्ती आहे. हे कारण देत न्यायालयाने ताबा देण्यास नकार दिला.

आशेचा एक किरण

मुलाचा ताबा देण्याची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असला, तरी एक मार्ग अतुल सुभाष याच्या आईसाठी मोकळा ठेवला आहे. मुलगा सध्या कोणाकडे आहे आणि तो सुरक्षित आहे की नाही, हे समजण्यासाठी सुभाष याच्या आईने केलेली हेबियस कॉर्पस याचिका न्यायालयाने जीवीत ठेवली आहे. या याचिकेवर नंतर सुनावणी होणार आहे. या सुनावणीचा निर्णय सुभाष याच्या आईच्या बाजूने लागला, तर निकिता सिंघानिया हिला या मुलाला न्यायालयात उपस्थित करावे लागणार आहे. तसे झाल्यास नातू सुरक्षित आहे की नाही, हे सुभाष याच्या आईला समजणार असून तसा दिलासाही मिळणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.