न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध टी 20i मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेतही विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने सीडन पार्क, हॅमिल्टन येथे झालेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 113 धावांनी धुव्वा उडवला आहे. उभयसंघात पावसाच्या व्यत्ययामुळे 37 ओव्हरचा सामना खेळवण्यात आला. न्यूझीलंडने श्रीलंकेला विजयासाठी 256 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा डाव हा 30.2 ओव्हरमध्ये 142 धावांवर आटोपला. न्यूझीलंडने या विजयासह मालिकाही जिंकली. न्यूझीलंडने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेची बॅटिंग
श्रीलंकेकडून 256 धावांचा पाठलाग करताना फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर इतर फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. श्रीलंकेसाठी कामिंदु मेंडीस याने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. कामिंदुने 5 फोर आणि 3 सिक्ससह 64 रन्स केल्या. तर जनिथ लियानगे याने 22, चामिंदु विक्रमसिंघे याने 17 आणि अविष्का फर्नांडोने 10 धावा जोडल्या. न्यूझीलंडसाठी विलियम ओरुर्के याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. जेकब डफी याने दोघांना बाद केलं. तर मॅट हॅन्री, नॅथन स्मिथ आणि कॅप्टन मिचेल सँटनर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडने रचीन रवींद्र आणि मार्क चॅपमॅन या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर 250 पार मजल मारली. रचीन रवींद्र याने 79 तर मार्क चॅपमॅन याने 62 धावा केल्या. डॅरेल मिचेलने 38, ग्लेन फिलिप्स 22, मिचेल सँटनर 20 आणि विल यंग याने 16 धावा जोडल्या. न्यूझीलंडने यासह 37 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावू 255 धावा केल्या. महीश थीक्षना याने हॅटट्रिकसह 4 एकूण 4 विकेट्स घेतल्या. वानिंदु हसरंगा याने दोघांना बाद केलं. तर इशान मलिंगा आणि असिथा फर्नांडो या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
न्यूझीलंडचा 113 धावांनी विजय
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी आणि विल्यम ओरर्के.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, महीश थीक्षाना, एशान मलिंगा आणि अशिथा फर्नांडो.