संगमेश्वर-दुचाकीवर आदळला बिबट्या, दोघे जखमी
esakal January 09, 2025 02:45 AM

rat8p1.jpg
37219
मंदार रहाटे आणि प्राजक्ता कदम.
---
बिबट्या अचानक समोर आल्याने
दुचाकीचा अपघात, दोघे जखमी
संगमेश्वरमधील गावातही मुक्त संचार; वनविभागाकडून कार्यवाहीची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ८ः दुचाकीसमोर अचानक बिबट्या आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह अन्य एक महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ८) सकाळी साडेआठच्या सुमारास शास्त्रीपूल आंबेड-डिंगणी मुख्य रस्त्यावर घडली.
जंगलभाग सोडून गेले काही दिवस संगमेश्वर शहरासह आजूबाजूच्या गावांत जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याची भक्ष्यासाठी रात्रंदिवस भटकंती सुरू आहे. काहींना प्रत्यक्षात बिबट्याचे दर्शन झाले आहे. मानवीवस्ती तसेच शहरीभाग व वाहनवर्दळीच्या ठिकाणी बिबट्या जनावरांच्या शिकारीसाठी भटकंती करत असल्याचे आणि सौरव रसाळ यांच्या घराजवळ येऊन भटक्या कुत्र्यांची पिल्ले पळवून नेत असतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
आज शास्त्रीपूल आंबेड-डिंगणी या नेहमीच वाहनवर्दळीने गजबलेल्या मुख्य रस्त्यावरच बिबट्याने आंबेडखुर्द येथील मंदार मोहन रहाटे (वय २६) व त्याच्याबरोबर दुचाकीवरून प्रवास करणारी प्राजक्ता संतोष चव्हाण हे रेल्वेस्टेशन येथे जात होते. आंबेड मुख्य रस्त्यावरून भांडारवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी अचानक धावत आलेल्या बिबट्याने दुचाकीला धडक दिली आणि तो जंगलाच्या दिशेने पळून गेला. दुचाकीसमोर बिबट्या आल्याने या दोघांची बोबडीच वळली. बिबट्याच्या धडकेने दुचाकी रस्त्यावरून काही अंतर घसपटत गेल्याने रहाटे व चव्हाण हे दोघेही जखमी झाले असून, या दोघांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.