टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका 1-3 ने गमावली. ऑस्ट्रेलियाने तब्बल 10 वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी उंचावली. त्यानंतर आता टीम इंडियाचे खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. नितीश रेड्डी याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झुंजार शतक ठोकत टीम इंडियाला सावरलं होतं. नितीशने पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय शतक करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं होतं. आता नितीश देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या टीमसाठी खेळताना दिसणार आहे. टीम इंडियाच्या मालिका पराभवानंतर हेड कोच गौतम गंभीर याने खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचं आवाहन केलं होतं.
पीटीआयनुसार, नितीश रेड्डी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्रप्रदेशकडून खेळताना दिसणार आहे. नितीश रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात खेळताना दिसणार आहे. आंध्र प्रदेशला 23 जानेवारी रोजी पुद्देचरी तर 30 जानेवारीला राजस्थानविरुद्ध खेळायचं आहे. नितीश या दोन्ही सामन्यांच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये असू शकतो.
नितीशने चौथ्या कसोटीत शतकी खेळी केली होती. तसेच नितीशने पर्थ आणि एडलेडमध्येही उल्लेखनीय खेळी केली. नितीशची आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात निवड करण्यात आली. त्यानंतर नितीशने बांगलादेशविरुद्धच्या टी 20i मालिकेत बॅटिंगने तडाखेदार कामगिरी केली होती.
नितीश रेड्डीची पहिल्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील फटकेबाजी
वॉशिंग्टन सुंदर, प्रसिध कृष्णा आणि देवदत्त पडीक्कल हे तिघ विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. हे तिन्ही खेळाडू आपल्या टीममध्ये बाद फेरीतील सामन्यांआधी सहभागी होतील. सुंदरने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आश्वासक कामगिरी केली. तर प्रसिध कृष्णाने पाचव्या कसोटी सामन्यात एकूण 6 विकेट्स घेतल्या. तर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत दवेदत्त पडीक्कल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. देवदत्तला पर्थमध्ये पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. तर दुसऱ्या डावात 25 धावा केल्या.