वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वादग्रस्त धर्मगुरु आसाराम बापू यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन संमत केला आहे. त्यामुळे ते 31 मार्चपर्यंत कारागृहाबाहेर राहू शकतील. त्यांनी वैद्यकीय कारणांसाठी जामिनाचा अर्ज सादर केला होता. त्यावर विचार करीत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय उपचार करुन घेण्यासाठी जामीन दिला आहे.
आसाराम बापू यांचे वय आणि त्यांना असणारा हृदयविकार लक्षात घेऊन त्यांना हा अंतरिम जामीन संमत करण्यात आला आहे. 31 मार्चपर्यंत ते कारागृहाच्या बाहेर राहू शकतात. त्यानंतर पुन्हा त्यांना कारागृहात जावे लागेल. मात्र, न्यायालय आवश्यकता भासल्यास त्यांच्या अंतरिम जामिनाचा कालावधी वाढवू शकते.
गुजरात उच्च न्यायालयात अपयश
ऑगस्ट 2024 मध्ये आसाराम बापू यांनी गुजरात उच्च न्यायालयात वैद्यकीय कारणास्तव जामिनासाठी अर्ज सादर केला होता. तथापि, उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर केला होता. आसाराम बापू यांचे वय 86 आहे. त्यांनी आपल्या आश्रमात वास्तव्यास असणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार केला होता, असा आरोप त्यांच्यावर आहे. याच आरोपात त्यांना 2023 मध्ये गुजरातमधील गांधीनगर येथील न्यायालयाने शिक्षा दिली होती. सध्या ते राजस्थानातील जोधपूर येथील कारागृहात शिक्षा भोगत आहेत.