Hollywood Fire: लॉस एंजिलिसच्या जंगलात वणवा, हॉलिवूड कलाकारांचे बंगले जळून खाक
esakal January 09, 2025 06:45 PM

Wildfire in Los Angeles forest: अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजिलिस इथं मंगळवारी जंगलातील आग वेगवान वाऱ्यामुळे पसरल्यानं अनेक घरं जळून खाक झाली आहेत. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग हा ९७ किमी प्रतितास इतका होता. यामुळे वेगाने आग पसरली. पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. आगीत एक हजारापेक्षा जास्त घरं जळून खाक झाल्याची माहिती समोर आलीय.

हॉलीवूडमधील कलाकारांचे बंगलेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी राहतं घर सोडावं लागलं. आगीच्या ठिणग्या पडायला लागल्यानं लोकांनी गाड्यांमधूनही पळ काढला. लोक धावत सुटले होते तर रस्त्यांवर गर्दी झाली होती. बुधवारी लॉस एंजिलिस काउंटीत जवळपास १ लाख ८८ हजार घरांची वीज खंडित झाली. इथं वाऱ्याचा वेग १२९ किमी प्रतितास इतका झाला होता.

लॉस एंजिलिसच्या अग्निशमन विभाग प्रमुखांनी सांगितले की, अद्याप धोका टळलेला नाहीय. हजारो कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मंगळवारी सायंकाळी लॉस एंजिलिसच्या उत्तर-पूर्व क्षागात आग भडकली. ही आग २ हजार एकरपेक्षा जास्त भागात पसरलीय.

आग इतकी वेगाने पसरली की वृद्धांसाठी असणाऱ्या हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांनी २० ते २५ वृद्धांना व्हीलचेअर आणि स्ट्रेचरवरून बाहेर काढलं. रुग्णवाहिकेतून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. काही तासातच आग शहरातील पॅसिफिक पालिसॅडसजवळ असलेल्या ५ हजार एकरात पसरली. या भागात हॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांचे वास्तव्य आहे. त्यांचीही घरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.