Gujrat Latest news: गुजरातमधून येऊन ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली. कन्नूभाई सोलंकी आणि शरीफ खान अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याच टोळीतील जिग्नेश घासी आणि जसवंत मीना या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.
कल्याण पश्चिम येथील पौर्णिमा चौक परिसरात काही दिवसांपूर्वी एका महिलेची सोनसाखळी चोरून चोरटे पसार झाले होते. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेनंतर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला.
उपायुक्त अतुल झेंडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास मडके यांनी तपास मोहीम उभारली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील हिम्मतनगर येथील कन्नूभाई आणि जिग्नेश हे बांधकाम मजूर म्हणून काम करतात. काही काळ काम केल्यानंतर सुट्टी घेऊन ते वसई येथे मित्र शरीफ खानच्या घरी येत.
शरीफ हा खासगी कंपनीत कामाला आहे. चोरटे त्याच्या घरी राहून ठाणे आणि पालघर परिसरात चेन स्नॅचिंग करीत. लुटलेला माल जसवंत मीना नावाच्या व्यक्तीकडे विक्रीसाठी दिला जात असे. मिळालेली रक्कम चौघांत वाटून घेत होते.
या टोळीने आतापर्यंत २० चोऱ्या केल्याची कबुली दिली असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.