SSC And HSC Exam : लाखभर विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा; विभागात बारावीला ९५ हजार परीक्षार्थी, यंदा दहा दिवसआधी होतेय परीक्षा
esakal January 09, 2025 12:45 PM

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागाच्या वतीने दहावी, बारावी परीक्षेची तयारी सुरू आहे. विभागातील लातूर, नांदेड, धाराशिव या तीन जिल्ह्यातील एकूण १ लाख ८ हजार ९२५ विद्यार्थी इयत्ता दहावीची तर ९५ हजार ६९७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. विद्यार्थी संख्येचा विचार करून यंदा परीक्षा केंद्रात वाढ करण्यात आली आहे.

दहावीची परीक्षा ४१३, बारावीची परीक्षा २४९ केंद्रांवर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या आणि दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाते. यंदाच्या परीक्षांचे नियोजनाचे काम सुरू आहे. लेखी परीक्षेला एक महिना शिल्लक असल्याने टप्प्याटप्प्याने माहिती सांगितली जाईल, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले.

विभागात ८९९ महाविद्यालय

लातूर विभागातील लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांतील १ लाख ८ हजार ९२५ विद्यार्थी दहावीची परीक्षा देतील. नांदेड ७३५, लातूर ६८२, तर धाराशिवमधील ४३१ अशा १ हजार ८४८ शाळांमधील आहेत. बारावीच्या परीक्षेस ९५ हजार ६९७ विद्यार्थी बसणार आहेत. हे विद्यार्थी नांदेडमधील ३४६, लातूरमधील ३७२ तर धाराशिवमधील १८१ अशा एकूण ८९९ महाविद्यालयातील आहेत, असे लातूर विभागीय मंडळातर्फे सांगण्यात आले.

बारावीची प्रात्यक्षिक (तोंडी) परीक्षा २४ जानेवारीपासून

इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक (तोंडी) परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत तर लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान होणार आहेत. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक (तोंडी) परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेने यंदा दहावी-बारावीची परीक्षा दहा दिवस आधी होत आहे. शिक्षण मंडळाकडून परीक्षेचे नियोजन सुरू असून परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

अशी आहे विद्यार्थी संख्या

जिल्हा दहावी बारावी

  • नांदेड ४८,१२० ४२,२३९

  • लातूर ३९,०९४ ३६,८४७

  • धाराशिव २१,७११ १६,३०६

अशी आहे परीक्षा केंद्र संख्या

  • जिल्हा दहावी बारावी

  • नांदेड १७२ १०७

  • लातूर १५२ १००

  • धाराशिव ८९ ४२

लातूर विभागीय मंडळातील तीनही जिल्ह्यांत दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी सुरू झालेली आहे. संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंडळाने नेमून दिलेली कामे वेळेत त्यांनी पूर्ण करावीत. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर देताना ताण घेऊ नये. हसत-खेळत अभ्यास करावा.

- सुधाकर तेलंग,

विभागीय अध्यक्ष, लातूर विभाग

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.