Mumbai Local: धुके, चेन पुलिंगने अडवली रेल्वेची वाट; सहा लोकल रद्द, आठ मेल-एक्स्प्रेसला लेटमार्क
esakal January 09, 2025 12:45 PM

Mumbai Latest News: वाढलेली थंडी आणि धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसत आहे. त्यातच चेन पुलिंगच्या घटनांमुळे मध्य रेल्वेच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होत आहे. परिणामी, बुधवारी (ता. ८) सहा लोकल रद्द करण्यात आल्या, तर आठ मेल-एक्स्प्रेस गाड्यांना लेटमार्क लागला, त्यामुळे मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील हवेची गुणवत्ता कमी झाली. कर्जत, बदलापूर आणि खोपोलीमध्ये दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसत आहे. पहाटेच्या सुमारास खंडाळा आणि कसारा घाटातील धुक्यामुळे अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेगावर मर्यादा  येत आहे.

---

परिणामी, मुंबईला येणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या निर्धारित वेळेपेक्षाही विलंबाने धावत आहेत. हवेतील दृश्यमानता कमी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून  मेल- एक्स्प्रेस- लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत. परिणामी, मेल- एक्स्प्रेस गाड्यांचा वेग मंदावतो. त्याचा फटका मुंबईतील लोकल वाहतुकीवर होत असल्याचे दिसत आहे.

चेन पुलिंगच्या तीन घटना
मुंबईत बुधवारी सकाळी येणाऱ्या  १२५९७ गोरखपूर-सीएसएमटी अंत्योदय एक्स्प्रेस, १२२६२ हावडा-सीएसएमटी एक्स प्रेस, ०१०२८ गोरखपूर-दादर स्पेशल तीन गाड्यांमध्ये चेन पुलिंगच्या घटना घडल्या, त्यामुळे या गाड्या काही वेळासाठी थांबविण्यात आल्याने या गाड्यांना विलंब झाला. त्याचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावर झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.