Suresh Dhas on Walmik Karad मुंबई – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड आणि गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई केली पाहिजे. वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यात कायम चोर आणि गुन्हेगारांना साथ देत आला आहे. वाल्मिक कराड आणि गँगवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई केली नाही तर महाराष्ट्रात तिहार सारखी परिस्थिती निर्माण होईल. ज्या प्रमाणे बिश्नोई गँगची संपूर्ण देशात दहशत आहे. सलमान खानला बिश्नोई गँग धमकी देते, तसेच वाल्मिक कराड गँग महाराष्ट्रात दहशत निर्माण करेल, अशी शक्यता आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली. मराठवाड्यातील मल्टिस्टेट बँकेतील घोटाळ्या प्रकरणी आमदार धस यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
आमदार सुरेश धस यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी वाल्मिक कराड आणि गँगवर मकोका लावावा, अन्यथा ते महाराष्ट्रात तिहार किंवा बिश्नोई गँग सारखे होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे. गृहमंत्रालयाने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आमदार धस यांनी केली. वाल्मिक कराड हा गुन्हेगारांचा साथीदार असल्याचीही टीका त्यांनी केली. जिल्ह्यात जिथे जिथे अवैध धंदे आणि प्रशासनात गैरकारभार होत असेल तिथे वाल्मिक कराड हा गुन्हेगारांना साथ देतो. मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीत घोटाळा झाला हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाले. या प्रकरणात वाल्मिक कराडने खंडणी स्वरुपात दोन कोटींची कार घेतली. एका पोलीस अधिकाऱ्याकडे दीड कोटींची रक्कम सापडली, तेव्हा हा त्याच्या बचावात उभा राहिला. वाल्मिक कराड हा चोर आणि गुन्हेगारांचा साथीदार आहे, असा आरोप आमदार धस यांनी केला.
– Advertisement –
आगामी काळात जिथे कुठे संतोष देशमुख हत्या प्रकरणात अक्रोश मोर्चा निघेल तिथे उपस्थित राहून वाल्मिक कराडच्या संपत्ती संबंधीचे आकडे सादर करणार असल्याचा दावा आमदार धस यांनी केला. बीड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत हे सर्व सुरु होते त्याचीमाहिती आकाच्या आकाला नव्हती का? असा सवाल उपस्थित करुन धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांचा या सर्व प्रकरणाला पाठिंबाच असल्याचा आरोप आमदार धस यांनी केला.
– Advertisement –
आमदार सुरेश धस यांनी परळीतील राख माफिया, पिकविमा माफिया, वाळू माफिया, भूखंड माफिया यांची कुंडलीच सादर करण्यास सुरुवात केली आहे. परळीमध्ये वाल्मिक कराड आणि गँगचा कसा हैदोस सुरु आहे, याचे किस्से ते रोज माध्यमांसमोर सांगत आहेत. वाल्मिक कराड आणि गँगने अनेकांचे खून पाडले असल्याचाही त्यांचा आरोप आहे. याबद्दल ते म्हणाले की, किशोर फड, संगीत दिघोळे यांच्यासह अनेकांचे खून झाले आहेत. या पीडित कुटुंबियांच्या भेटीला परळीला जाणार आहे. यातील एकाच्या मातोश्रीने मला फोन करुन म्हटलं की, आजपर्यंत कोणी बोललं नाही, तु बोलला. त्यामुळे मी त्यांच्या भेटीसाठी जाणार आहे.
हेही वाचा : Sanjay Raut : संजय राऊतांनी वाल्मिक कराडचा आणखी एक फोटो केला ट्विट; सांगा तपास कसा होईल?