'कोऱ्या कागदावर सह्या घेऊन धनंजय मुंडेंनी माझी जमीन हडपली'; सारंगी महाजनांचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
esakal January 09, 2025 03:45 PM

मंत्री पंकजा मुंडे यांचाही त्यांना पाठिंबा असल्याचेही सारंगी यांचे म्हणणे आहे. आज त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतल्यानंतर यासंबंधीची माहिती पत्रकारांना दिली.

मुंबई : मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) अडचणीत आलेल्या मंत्री (Dhananjay Munde) यांच्यावर आता सारंगी महाजन यांनी त्यांची जमीन हडपल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.

धनंजय मुंडे यांनी ठरवलेल्या रकमेवर सही करत मी जोपर्यंत जमीन विकत नाही तोपर्यंत मला परळी सोडू दिली नाही, असा आरोप सारंगी यांनी केला. मंत्री पंकजा मुंडे यांचाही त्यांना पाठिंबा असल्याचेही सारंगी यांचे म्हणणे आहे. आज त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतल्यानंतर यासंबंधीची माहिती पत्रकारांना दिली.

त्या म्हणाल्या, ‘‘६ जून २०२२ ची ही घटना आहे. माझ्या जमिनीत मुंडे बंधू-भगिनींना काय रस आहे, हे मला कळले नाही. मुंडेंच्या घरातील एका नोकराला ही जमीन विकावी, असा दबाव माझ्यावर टाकला. कोऱ्या कागदावर सह्या घेऊन हजार रुपयाच्या इस्सार चिठ्ठीवर माझी सही घेण्यात आली. त्यानंतरच मला परळी सोडू दिले. त्यानंतर धनंजय मुंडे यांना मी भेटायला गेले तेव्हा त्यांनी मामी तुम्ही उगाच दबावात आलात,आता मी तुम्हाला जमिनीचा योग्य भाव देतो, असे सांगितले.

स्वत:च्या नातेवाईकांनाही लुबाडणाऱ्या या मंडळींचे करायचे तरी काय? ज्या नोकराला माझी जमीन विकायला लावली त्याच्याकडे आज चार गाड्या आहेत. आमच्यापेक्षाही जास्त संपत्ती आहे. या जमिनीवर आता पंकजा मुंडे यांनी झोपडी बांधून नोकर ठेवले आहेत. त्यावेळी त्या सत्तेत नव्हत्या म्हणून मी त्यांच्याकडे गेले नाही. अजित पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी आपण योग्य ती पावले उचलू’’ असे आश्वासन दिले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.