इन्स्टावरुन फोटो उडवले, एकमेकांना अनफॉलो केले; चहल-धनश्रीनंतर टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूच्या आयुष्यात वादळ
Marathi January 09, 2025 06:24 PM

टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या काही वर्षात वादळ आले. दिनेश कार्तिक, शिखर धवन, हार्दिक पंड्या यांचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला. यातील काही खेळाडूंनी दुसरीसोबत संसारही थाटला. त्यानंतर फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यातील नातेही संपुष्टात आल्याची चर्चा आहे. या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलोही केले आहे. चहलने तर धनश्रीचे फोटोही डिलिट केले आहेत. या दोघांनंतर टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूच्या खासगी आयुष्यात मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे.

टीम इंडियाचा खेळाडू मनिष पांडे आणि त्याची पत्नी आश्रिता शेट्टी यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या येत आहेत. बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर असलेल्या मनिष पांडे याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरुन त्याची पत्नी आश्रिता शेट्टी हिचे फोटो गायब झाले आहेत.

मनिष पांडे सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो. मात्र इन्स्टाग्रामवर त्याने पत्नीसोबत अनेक फोटो शेअर केलेले होते. मात्र आता हे फोटो डिलिट करण्यात आले आहेत. दुसरी आश्रिता शेट्टी हिनेही आपल्या इन्स्टा प्रोफाईलवरुन मनिष पांडे याचे फोटो हटवले आहेत. एवढेच नाही तर दोघांनी एकमेकांना अनफॉलोही केले आहे.

2019 मध्ये झालेले लग्न

2015 मध्ये टीम इंडियात पदार्पण केलेल्या मनिष पांडे याने 2019 मध्ये आश्रिता शेट्टी हिच्याशी विवाह केला. आश्रिता हिचे कुटुंब कर्नाटकचे असून ती तमिळ चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करते. लग्नानंतर आयपीएलच्या अनेक लढतींवेळी दोघे एकत्र दिसले. मात्र आयपीएल 2024 पासून दोघांच्या नात्याला तडा गेला. मनिष पांडेचा कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजेतेपद पटकाव्यानंतरही आश्रिताने एकही पोस्ट केली नव्हती.

पहिला शतकवीर

दर्यान, मनिष पांडे आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला हिंदुस्थानी खेळाडू आहे. 2009 मध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने शतक ठोकले होते. 2015 मध्ये त्याला टीम इंडियाकडून संधी मिळाली. मात्र खराब फॉर्ममुळे 2021 पासून त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने टीम इंडियाकडून 29 वन डे लढतीत 566 आणि 39 टी20 लढतीत 709 धावा केलेल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.