विरार, ता. ९ (बातमीदार) : वसईच्या अंबाडी रोड परिसरात तत्कालीन नवघर माणिकपूर नगर परिषद काळामध्ये स्विमिंग पूल बांधण्यात आला होता, परंतु हा पूल सहा महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत माजी महापौर नारायण मानकर यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांचे पत्र देऊन लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत आयुक्तांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना स्विमिंग पुलाची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. या पुलाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून, लवकरच त्या ठिकाणी जी कामे आहेत, ती पूर्ण करून पूल नागरिकांसाठी सुरू करण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अंबाडी येथील स्विमिंग पुलासाठी सुमारे एक हजारहून अधिक लोकांनी सभासदत्व घेतले आहे. या पुलामध्ये अनेक मुले पोहण्यासाठी शिकलेली आहेत, तसेच नागरिक नियमितपणे पोहायला येतात, मात्र मागील सहा महिन्यांपासून शेड व अन्य दुरुस्तीसाठी पूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिक वारंवार तक्रारी करीत आहेत. स्विमिंग पूल दुरुस्तीकामाची निविदा युद्धपातळीवर करून त्वरित काम सुरू करण्यात यावे, अशी नारायण मानकर यांनी पत्र देत मागणी केली होती. त्यानुसार शहर अभियंता प्रदीप पाचंगे, कार्यकारी अभियंता प्रकाश साटम, अमोल जाधव यांनी स्विमिंग पुलाची पाहणी केली. या वेळी नारायण मानकर, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, माजी सभापती उमा पाटील हजर होते. या वेळी स्विमिंग पुलाच्या शेडसहित अन्य कामांची पाहणी केली. या सर्व कामाची एकत्रित निविदा काढून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून स्विमिंग पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन प्रदीप पाचंगे यांनी मानकर यांना दिले.