Chakan Bypass Road : चाकण बाह्यवळण रस्ता अखेर मार्गावर; अंदाजपत्रकाचे काम अंतिम टप्प्यात
esakal January 10, 2025 05:45 AM

चाकण - येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)ने प्रस्तावित केलेला रासेफाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी या चाकणचा प्रस्तावित बाह्यवळण मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. या मार्गासाठी खर्चाचे अंदाजपत्रक अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या बाह्यवळण मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती ‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे यांनी ‘सकाळ’ला दिली.

गेली अनेक वर्षांपासून चाकण बाह्यवळण मार्गाची चर्चा सुरू आहे. परंतु वाहतूक कोंडीला पर्याय असणारा हा मार्ग काही होत नव्हता. त्यामुळे उद्योजक, नागरिक, वाहनचालक, कामगार सारेच वैतागले आहेत. ‘पीएमआरडीए’चा बाह्यवळण मार्ग लवकर व्हावा, या मार्गाच्या अंतिम हद्दी निश्चित करून मार्गाचे काम लवकर मार्गी लावावे, अशी त्यांची मागणी आहे.

राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव येथे बाह्यवळण मार्ग झाल्यानंतर चाकण (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून बाह्यवळण मार्ग महत्त्वाचा असला तरी हा बाह्यवळण मार्ग का होत नाही? असा सवाल नागरिक, कामगार, उद्योजक करत आहेत. चाकणला बाह्यवळण मार्ग व्हावा याबाबत मुख्यमंत्री, तसेच संबंधित विभागाला यापूर्वी निवेदनेही देण्यात आली आहेत.

चाकण येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ३० वर्षांपासून प्रस्तावित असलेला जुना ३६ मीटर रुंदीचा बाह्यवळण मार्ग कोठून होणार? याची पाहणी ‘पीएमआरडीए’चे अधिकारी, संबंधित पोलिस, वाहतूक विभागाच्या तत्कालीन उपायुक्तांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. या मार्गासाठी अत्याधुनिक पद्धतीने मोजणीही झाली होती. मात्र, या मार्गाच्या अंतिम हद्दी निश्चित करण्याचे काम अजूनही झाले नाही.

हा मार्ग लवकर व्हावा, तो प्रस्तावित न ठेवता ‘पीएमआरडीए’ने प्रत्यक्षात काम करावे अशी मागणी मेदनकरवाडीचे सरपंच अमोल साळवे, उपसरपंच महेंद्र मेदनकर, ॲड. संकेत मेदनकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांनी केली आहे.

वाहतूक कोंडी सुटणार

चाकण शहरातील व पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-शिक्रापूर, चाकण-तळेगाव या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चाकणचा बाह्यवळण मार्ग महत्त्वाचा आहे. औद्योगिक वसाहतीतील वाहतूक या मार्गाने येऊन चाकण-शिक्रापूर मार्गाकडे जाणार आहे. शिक्रापूर मार्गाने आलेली अहिल्यानगर, मराठवाड्यातील वाहतूक पुणे -नाशिक महामार्गावर येऊन पुणे, नाशिक, तळेगाव, मुंबई या भागाकडे जाणार आहे.

या मार्गाचे काम ‘पीएमआरडीए’ कधी सुरू करणार, हा मात्र नागरिकांचा सवाल आहे. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत गावे जाऊन विकास होत नसेल, तर ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतून गावे वगळा, असाही नागरिकांचा कल आहे. हा मार्ग झाल्यास अपघात कमी होतील. वाहतूक कोंडी कमी होईल, रुग्णवाहिका कोंडीत अडकून रुग्णांचे जीव जाणार नाहीत, हे वास्तव आहे.

शेतकऱ्यांना रोख मोबदला

बाह्यवळण मार्गाच्या जमिनी बहुतांशपणे शेतकऱ्यांच्या आहेत. या जमिनी संपादित करताना शेतकऱ्यांना, तसेच इतरांना ‘एफएसआय’ तसेच रोख रकमेचा मोबदला देण्यात येणार आहे. जमिनींचे संपादन झाल्यानंतर या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

असा आहे बाह्यवळण रस्ता

मार्ग : रासेफाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी, बंगला वस्ती

अंतर : अडीच किलोमीटर

रुंदी : ३६ मीटर चारपदरी,

मार्गाची बांधणी : दोन्ही बाजूंना दोन लेन, मध्यभागी दुभाजक, वेगवेगळ्या ठिकाणी चौक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.