Shanishingnapur Temple : शनिशिंगणापूर देवस्थानाच्या उत्पन्नात ५ कोटींनी वाढ; वर्षभरात दर्शनासाठी आले ७५ लाख भाविक
Saam TV January 10, 2025 05:45 PM

सुशील थोरात 

अहिल्यानगर : देवस्थानांवर जाऊन त्याठिकाणी दान करणाऱ्या भाविकांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे देवस्थानांच्या उत्पन्नात देखील वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या उत्पन्नात पाच कोटींनी वाढ झाली आहे. हि वाढ गतवर्षीच्या म्हणजे २०२३ या वर्षात आलेल्या उत्पन्नापेक्षा २०२४ मध्ये पाच कोटींनी वाढ झाली आहे.

काळामध्ये मंदिर बंद असल्याने देवस्थानच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. या ठिकाणी भेट देणाऱ्या भाविकांमध्ये देखील मोठी घट झाली होती. मात्र पुन्हा आता गेल्या तीन वर्षांमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत. तसेच आता देवस्थाने मंदिराभोवती सुशोभीकरण केले असल्यामुळे या ठिकाणी पाहण्यासाठी जिल्ह्यासह राज्याची आणि देशातील भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे.

७५ लाख भाविकांनी घेतले दर्शन  

शनिशिंगणापूर देवस्थानावर २०२३ या वर्षात ४० कोटी रुपये उत्पन्न देवस्थानला मिळाले होते. तर २०२४ या वर्षात ४५ कोटी रुपये उत्पन्न देवस्थानला मिळाले आहे. दानपत्रातील देणगी, बर्फी प्रसाद, चौथरा सशुल्क दर्शन, काउंटर तेल विक्रीच्या माध्यमातून शनिशिंगणापूर देवस्थानला हे उत्पन्न मिळाले आहे. २०२३ या वर्षात जवळपास ६० लाख भाविकांनी शनिदर्शन घेतले होते. तर २०२४ या वर्षात जवळपास ७५ लाख भाविकांनी शनीदर्शन घेतले. 

सुशोभीकरणामुळे भाविकांचा ओढा वाढला 

दरम्यान मंदिर सुशोभीकरणाचा फायदाही शनिशिंगणापूर देवस्थान होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. मंदिराच्या शेजारून जाणाऱ्या पानस नाल्यावर घाट बांधल्याने या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. शनिशिंगणापूर देवस्थानकडून भाविकांसाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या जात असल्याने भाविकांचा ओढा शनिशिंगणापूरकडे वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.