वूमन्स टीम इंडियाने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने आयर्लंडवर 6 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली आहे. आयर्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 239 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 34.3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने 241 धावा केल्या. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना हा आता रविवारी 12 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.
प्रतिका रावल आणि तेजल हसबनीस या दोघी टीम इंडियाच्या विजयाच्या नायिका ठरल्या. या दोघींनी टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. प्रतिका रावल हीने 96 बॉलमध्ये 10 फोर आणि 1 सिक्ससह 89 रन्स केल्या. कॅप्टन स्मृती मंधाना हीने 29 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्ससह 41 रन्स केल्या. हर्लीन देओलस हीने 20 तर जेमिमाह रॉड्रिग्स हीने 9 धावा केल्या. त्यानंतर तेजल हसबनीस आणि रिचा घोष या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. ही जोडी नाबाद परतली. तेजलने 46 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रिचाने 2 चौकारांसह 8 धावा केल्या. आयर्लंडकडून एमी मॅकग्वायर हीने 3 विकेट्स मिळवल्या. तर फ्रेया सार्जेंट हीने 1 विकेट घेतली.
त्याआधी आयर्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. आयर्लंडने कॅप्टन गॅबी लुईस आणि ली पॉल या दोघींच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 238 धावांपर्यंत मजल मारली. लुईस हीने 129 बॉलमध्ये 15 फोरसह 92 रन्स केल्या. तर ली पॉलने 73 चेंडूत 7 चौकारांसह 59 धावांची खेळी केली. तर भारतीय गोलंदाजांनी इतरांना मोठी खेळी करण्यापासून रोखलं. टीम इंडियाकडून प्रिया मिश्रा हीने 2 विकेट्स मिळवल्या. तर तितास साधू, सायली सातघरे आणि दीप्ती शर्मा या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
महिला ब्रिगेडची विजयी सुरुवात
आयर्लंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : गॅबी लुईस (कर्णधार), सारा फोर्ब्स, उना रेमंड-होई, ओरला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलेनी, लेह पॉल, कुल्टर रेली (विकेटकीपर), आर्लेन केली, जॉर्जिना डेम्पसे, फ्रेया सार्जेंट आणि एमी मॅग्वायर.
इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, तेजल हसबनीस, ऋचा घोष (विकेटकीपर), सायली सातघरे, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा आणि तीतस साधू.