चूक झाली अन् Champions Trophy 2025 चं यजमान घेतलं! PCB ला पश्चाताप होणारी बातमी, इंग्लंडनंतर दक्षिण आफ्रिकेचंही बंड...
esakal January 10, 2025 05:45 PM

Champions Trophy 2025 in Jeopardy as Boycott Calls Grow Against Afghanistan

स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) त्यासाठीचं वेळापत्रकही जाहीर केलं आहे, परंतु ज्या लाहोर, रावळपिंडी आणि कराची येथील स्टेडियमवर हे सामने होणार आहेत, तेथील काम अजून अपूर्ण असल्याचे दिसतेय. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तानातून दुबईत खेळवली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. ( PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी वेळेत काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले आहे. हे एक संकट असता इंग्लंडच्या १६० हून अधिक राजकिय नेत्यांनी इंग्लंड संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीत अफगाणिस्तानविरुद्ध खेळू नका, असे आवाहन केलं आहे. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडा मंत्र्यानेही विरोधाची तलवार उपसली आहे.

दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा मंत्री गेयटन मॅकेंझी यांनी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या मागणीला पाठींबा जाहीर केला आहे. ब्रिटनमधील काही राजकारण्यांनी या आशयाचे पत्र इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाला ( ECB) पाठवले होते. त्याला मॅकेंझी यांनी समर्थन दिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर केलेल्या दोन गटांमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे एकाच गटात आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आहे आणि त्यांनी महिलांच्या हक्कांवर गदा आणली आहे.

दक्षिण आफ्रिकेला २१ फेब्रुवारीला कराची येथे पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. पण, मॅकेंझी यांनी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला ( CSA) अफगाणिस्तानविरुद्ध सामना न खेळून तालिबान सरकारला महिला हक्काबद्दल स्पष्ट संदेश द्यायला हवा, असे म्हटले आहे. "क्रिकेट दक्षिण आफ्रिका, इतर देशांच्या संघटना आणि आयसीसी यांना क्रिकेट हा खेळ जगाला आणि विशेषतः महिलांना काय संदेश देऊ इच्छितो याचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानविरुद्धच्या क्रिकेट सामन्यांचा सन्मान करावा की नाही याचा अंतिम निर्णय क्रीडा मंत्री म्हणून घेणे माझे काम नाही. जर हा निर्णय माझा असता तर तो नक्कीच झाला नसता," असेही त्यांनी स्पष्ट केले.

वर्णभेदाच्या काळात वाढलेला एक पुरूष म्हणून, मॅकेंझीने आपली भूमिका वैयक्तिक आणि नैतिक मुद्दा म्हणून मांडली. त्याला प्रतिसाद म्हणून, क्रिकेट साउथ आफ्रिकेने एक निवेदन जारी करून त्यांच्या भूमिकेवर भर दिला. CSA ने म्हटले आहे की, ते आयसीसीच्या नेतृत्वाचे पालन करतील आणि सर्व आयसीसी सदस्यांकडून एकात्म दृष्टिकोन आवश्यक आहे. सीएसएला अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या हक्कांचे उल्लंघन आणि दडपशाही घृणास्पद वाटते. महिला क्रिकेटला समान मान्यता आणि संसाधने मिळायला हवीत यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयसीसीची स्पर्धा असल्याने, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागाच्या आवश्यकता आणि नियमांनुसार अफगाणिस्तानवरील भूमिका जागतिक संस्थेने मार्गदर्शन केली पाहिजे."

ऑस्ट्रेलिया हा आणखी एक संघ अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे, ज्यांचा लाहोरमध्ये सामना २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यापूर्वी मार्च २०२४ मध्ये अफगाणिस्तानविरुद्धची द्विपक्षीय टी२० मालिका तालिबान राजवटीत मानवी हक्कांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करून पुढे ढकलली होती. पण, ऑस्ट्रेलिया २०२३ च्या वर्ल्ड कप आणि २०२४ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध खेळले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.