सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात १४ हजार बसगाड्या असून त्यातील जवळपास २४०० गाड्या १३ ते १४ वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत. या गाड्यांना लांबचा प्रवास सोसत नसल्याचे चित्र आहे. दररोज वाटेतच गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी महामंडळाची सद्य:स्थिती आहे. मागील नऊ महिन्यात खर्च सात हजार १८५ कोटींचा आणि सहा हजार ७१३ कोटींचे, अशी स्थिती समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील भाडे तत्त्वावरील बसगाड्यांचा खर्च १२८ कोटी ९६ लाख रुपयांचा आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन व अंशदानावरील वार्षिक खर्च तीन हजार ५५३ कोटी ४४ लाखांचा आहे. तर डिझेलवरील खर्च तब्बल अडीच हजार कोटींचा आहे. भांडार सामान सुट्या भागांवरील खर्च ४५४ कोटींचा आहे. टोल टॅक्सपोटी महामंडळाला १६२ कोटी रुपये भरावे लागले आहेत. कर व अन्य खर्च ४०० कोटींचा आहे. जुनाट बसगाड्यांमुळे प्रवाशांची संख्याही काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र आहे.
जुनाट बसगाड्या कमी अंतरावर किंवा सहलीसाठी दिल्या जात असून त्या वाटेत बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रवाशांना वेळेत पोचायचे असते, पण बस बंद पडल्याने त्या प्रवाशांना दुसरी बस येईपर्यंत वाटेत थांबावे लागते. त्यांनी ऑनलाइन तिकीट काढल्याने त्यांना बहुतेक वेळा तिकीट परत दिले जात नाही, अशाही प्रवाशांच्या तक्रारी आहेत. आता परिवहनच्या ताफ्यात दरमहा ३०० बसगाड्या येणार असून त्यानंतर हा गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीवरील खर्च कमी होईल, असा विश्वास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
२०२४-२५ मधील खर्च अन् उत्पन्न
सवलतीशिवाय उत्पन्न
३७७१.७२ कोटी
सवलत मूल्य
२९४१.२९ कोटी
एकूण उत्पन्न
६,७१३.०१ कोटी
एकूण खर्च
७१८४.४९ कोटी
सहलीला गेलेले विद्यार्थी वैतागले
चिंचोळी (ता. मोहोळ) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सहल लेण्याद्री येथे गेली आहे. महामंडळाच्या एमएच १४, बीटी ४९८७ या बसगाडीतून त्यांची सहल रवाना झाली. पण, लेण्याद्रीला पोचण्यापूर्वीच वाटेत त्यांची बस बंद पडली. विद्यार्थ्यांना दोन तासांनी दुसऱ्या बसची व्यवस्था करुन लेण्याद्रीला रवाना करण्यात आले. अजूनही सहलीतील काही ठिकाणांना भेटी द्यायचे बाकी असतानाच पुन्हा एकदा त्या बसमध्ये बिघाड झाल्याचे शिक्षकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.