सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठा येथील बोगस डॉक्टराविरुद्ध मंद्रूप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतीही वैध नोंदणी व शैक्षणिक पात्रता नसताना तो लोकांवर उपचार करायचा, अशी फिर्याद तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलम घोगरे यांनी दिली होती. हसनसाब सैपनसाब मुजावर (वय ५०) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टराचे नाव आहे.
महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट १९६१ मधील कलम ३३ नुसार त्या डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. स्वत: वैद्यकीय मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिक नसताना देखील तो माळकवठा गावात दवाखाना चालवत होता. त्याच्याविरुद्ध २०२१ मध्ये देखील कारवाई होऊन गुन्हा दाखल झाला होता. तरीदेखील त्याचा दवाखाना गावात सुरूच होता. त्यासंदर्भातील तक्रार तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली होती.
अवैधारीत्या तो वैद्यकीय परवाना असल्याचे भासवून लोकांकडून उपचाराचे पैसे घेत होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला, तेव्हा काही औषधगोळ्या व इंजेक्शन सापडले आहेत. डॉ. घोगरे यांच्या फिर्यादीवरून मंद्रूप पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यावर तो गावातून फरार झाला आहे. पोलिस हवालदार राजकुमार गुरव तपास करीत आहेत. पोलिसांनी शुक्रवारी (ता. १०) दवाखान्यात जाऊन पंचनामा केला असून, तेथून औषधे जप्त केली आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी ग्रामपंचायतीलाही माहिती
२०२१ मध्ये गुन्हा दाखल होऊन कारवाई झाल्यावर पुन्हा त्या बनावट डॉक्टर हसनसाब मुजावर याने माळकवठा गावात लोकांवर उपचार करू नये, त्यासाठी खबरदारी घ्यावी, अशी माहिती संबंधित ग्रामपंचायतीलाही दिली होती, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीदेखील, तो बोगस डॉक्टर दवाखाना उघडून लोकांवर उपचार करत होता, हे विशेष. फरार बोगस डॉक्टरचा मंद्रूप पोलिस शोध घेत आहेत.