क्रेडिट कार्ड वापरता? मग या 6 गोष्टींकडे लक्ष द्या
BBC Marathi January 11, 2025 02:45 PM
Getty Images

क्रेडिट कार्ड्स...20 व्या शतकाच्या शेवटी झालेली एक आर्थिक क्रांती. क्रेडिट कार्डला प्लास्टिक मनी असं देखील म्हणतात. कारण क्रेडिट कार्ड प्लास्टिकचं असतं.

त्याचा वापर आर्थिक बाबींसाठी होतो म्हणून. क्रेडिट कार्ड हे एखाद्या चाकू किंवा सुरीसारखं असतं. "जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर योग्यप्रकारे, चाणाक्षपणे केला तर ते अत्यंत फायद्याचं ठरतं.

मात्र जर तुम्ही त्याचा वापर बेशिस्तपणे, अयोगरित्या केला तर मात्र तुमचा हात कापला जाऊ शकतो." म्हणजेच तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकता.

त्यामुळे क्रेडिट कार्ड घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच किंबहुना त्याहूनही महत्त्वाचं आहे त्याचा योग्यप्रकारे वापर करणं.

विशेषत: क्रेडिट कार्डचा वापर पहिल्यांदाच करणाऱ्यांनी दक्ष राहिलं पाहिजे. कारण तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर कसा करता यावर तुमची 'क्रेडिट हिस्ट्री' अवलंबून असते.

BBC

BBC

आता क्रेडिट हिस्ट्रीची चिंता का करायची तर, गृहकर्ज घ्यायचं असो, वैयक्तिक कर्ज म्हणजे पर्सनल लोन घ्यायचं असो...बँका किंवा वित्तीय संस्था याच क्रेडिट हिस्ट्रीला विचारत घेतात. कारण त्यातून तुमची आर्थिक शिस्त, तुमच्यावरील आर्थिक बोजा लक्षात येतो.

त्यामुळेच तुमच्या पहिल्याच क्रेडिट कार्डपासून चांगली क्रेडिट हिस्ट्री तयार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अन्यथा भविष्यात कर्ज मिळणं कठीण होऊ शकतं.

क्रेडिट कार्ड...एक ट्रॅप नाही

आपल्यापैकी अनेकजण कर्जाकडे एक जोखीम म्हणून पाहतात. अनेकजण, घरातील वडीलधारे अनेकदा विचारतात की, "गरजा भागवण्यासाठी किंवा एखादी वस्तू घेण्यासाठी पैसे उसनवार किंवा कर्जानं घेण्याची गरज आहे का?"

मात्र आजच्या काळात कर्ज घेतल्याशिवाय किंवा कर्जाचा वापर केल्याशिवाय जगाचं गाडंच हलत नाही.

Getty Images

जर आपण खरोखरंच त्याची आवश्यकता कुठे आहे, किती प्रमाणात घेण्याची गरज आहे, या गोष्टीचा विचार करत त्याचा वापर मर्यादित स्वरूपात आणि योग्यरित्या केला तर त्यातून कोणतीही समस्या निर्माण होत नाही.

मात्र आपण जर 40-50 दिवसांसाठी व्याजमुक्त पैसे किंवा कर्ज घेण्याचा विचार करत असू, तर आपण त्यात अडकून पडू.

क्रेडिट कार्डची कितपत गरज आहे हे लक्षात घ्या

क्रेडिट कार्डचा वापर ऐनवेळी असणारं आर्थिक पाठबळ म्हणून करावा. म्हणजेच ऐनवेळी एखाद्या गोष्टीसाठी कर्ज घेण्याऐवजी क्रेडिट कार्डचा वापर करता येऊ शकतो.

एखाद्या विशिष्ट परिस्थितीत गरज भागवण्यासाठी, वस्तू घेण्यासाठी किंवा आर्थिक कारणांमुळे क्रेडिट कार्डचा वापर केला जाऊ शकतो.

कारण क्रेडिट कार्डच्या पैशांवर जवळपास 40 दिवसांसाठी कोणतंही व्याज आकारलं जात नाही. त्या मुदतीच्या आत तुम्ही पैशांची परतफेड केली तर ते पैसे तुम्हाला बिनव्याजी वापरायला मिळतात.

जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या बिलाच्या अंतिम मुदतीच्या आत पैशांची परतफेड केली म्हणजे बिल भरलं तर तुमच्यावर कोणताही आकारला जात नाही.

Getty Images

क्रेडिट कार्डचा वापर केल्यावर रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात, डिस्काऊंट ऑफर्स मिळतात. हे त्याचे मिळणारे अतिरिक्त फायदे असतात.

अर्थात जर तुम्ही जर क्रेडिट कार्डचा वापर योग्यरित्या कसा करायचा याचं भान ठेवलं नाही तर क्रेडिट कार्डचा वापर करून अनावश्यक खर्च केला जातो. त्यातून तुम्ही आर्थिक संकटात सापडता.

तसंच वेळेवर क्रेडिट कार्डचं बिल भरू शकला नाहीत तर मात्र तुम्ही कर्जाच्या विळख्यात सापडता.

एखादी गोष्ट 100 रुपयांची आहे म्हणून आपण ती विकत घेतो आणि मग या सापळ्यात अडकतो. मग ती वस्तू आपल्या गरजेची आहे की नाही याचा विचार आपण करत नाही.

अनेकदा खिशात पैसे नसतात किंवा एखादी वस्तू आवाक्यात नसते, मात्र निव्वळ आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे म्हणून अनावश्यक खर्च केला जातो. असा खर्च टाळला पाहिजे. तुमच्या गरजेचं काय आहे आणि चैन काय आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे.

तुमच्यासाठी कोणतं क्रेडिट कार्ड योग्य असतं?

दर, फी, शुल्क, को-ब्रँडेड कार्ड...तुम्ही कोणतंही कार्ड वापरत असा, तुमच्या गरजेसाठी कोणतं कार्ड योग्य आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

काही बँका क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क आकारत नाहीत.

काही बँका क्रेडिट कार्डचा वापर करून विशिष्ट मर्यादेपर्यंत खर्च केल्यास वार्षिक शुल्क माफ करतात. तर काही बॅंका वार्षिक शुल्क आकारताना क्रेडिट कार्डचा वापर लक्षात घेत नाहीत.

Getty Images

त्यामुळे नेमकं कोणतं क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी योग्य आहे हे तपासून घ्या. ज्या बँका किंवा वित्तीय कंपन्या वार्षिक शुल्क आकारतात त्या अनेकदा जास्त रिवॉर्ड पॉईंट्स आणि ऑफर्स देतात. तुम्ही त्याचा वापर किती करू शकता हे तपासून घ्या.

जे लोक खूप जास्त खरेदी किंवा शॉपिंग करतात त्यांना ई-कॉमर्स कंपन्यांकडून को-ब्रँडेड कार्ड्स मिळतात. तर जे लोक खूप प्रवास करतात त्यांना ट्रॅव्हल कंपन्यांकडून को-ब्रॅंडेड कार्ड्स मिळतात.

या प्रकारच्या कार्ड्समध्ये खूप जास्त प्रमाणात रिवॉर्ड पॉईंट्स आणि ऑफर्स असतात.

1. एकाच कार्डचा वापर करा

तुमचं पहिलं क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर क्रेडिट हिस्ट्री तयार होण्यासाठी काही वेळ लागतो. त्यासाठी किमान एक वर्षाचा अवधी द्या. दरम्यानच्या काळात, जर एखाद्या कंपनी किंवा बॅंकेनं तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा कर्जाची ऑफर दिली तरी स्वीकारू नका.

कारण एकदा का तुम्हाला क्रेडिट कार्डचा वापर करण्याची सवय जडली की ती थांबवणं सोपं नसतं.

त्यामुळेच सुरुवातीचा काही काळ फक्त एकाच क्रेडिट कार्डचा वापर करा. हळूहळू तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवत जा. जर तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरत असाल तर बँक हळूहळू तुमची क्रेडिट लिमिट किंवा मर्यादा वाढवत नेईल.

2. क्रेडिट कार्डची सर्व लिमिट वापरू नका

क्रेडिट कार्डच्या संदर्भातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर, त्यातील लिमिटचा वापर.

समजा, बँकेनं जर तुम्हाला 100 रुपयांचं क्रेडिट लिमिट दिलं असेल तर त्यातील जास्तीत जास्त 20 ते 30 रुपयांचाच वापर करा.

तुम्ही क्रेडिट कार्डच्या लिमिटचा म्हणजे क्रेडिट कार्डचा जितका जास्त वापर कराल तितका तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होईल.

3. बिल भरताना पूर्ण बिल भरा

क्रेडिट कार्डच्या बाबतीतील लोकांना आवडणारी किंवा आकर्षून घेणारी आणखी एक बाब म्हणजे बिल भरताना असणारा मिनियम ड्यू म्हणजे बिलात भरायची किमान रक्कम.

क्रेडिट कार्डच्या बाबतीत हा पर्याय असतो की तुम्ही प्रत्येक वेळेस सर्व बिल भरू शकता किंवा एक ठराविक किमान आवश्यक रक्कम भरू शकता. उरलेली रक्कम तुम्हाला नंतर भरता येते.

जर तुम्ही क्रेडिट कार्डचं पूर्ण बिल ठरलेल्या मुदतीत भरू शकला नाहीत तर क्रेडिट कार्ड कंपनी तुम्हाला एक संधी देते. ती म्हणजे तुम्ही किमान रक्कम भरू शकता आणि त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअर किंवा क्रेडिट लिमिटवर कोणताही परिणाम होत नाही.

Getty Images

सर्वसाधारणपणे ही किमान रक्कम क्रेडिट लिमिटच्या पाच ते दहा टक्के असते. उदाहरणार्थ, जर तुमच्या क्रेडिट कार्डचं क्रेडिट लिमिट 50,000 रुपये असेल तर त्यासाठीचा मिनिमम बॅलन्स 2,500 रुपयांपर्यंत असेल.

अनेकजण कित्येक महिने क्रेडिट कार्ड पूर्ण बिल भरायचं टाळतात किंवा पुढे ढकलतात आणि फक्त किमान रक्कम भरतात. यामुळे दीर्घकाळात तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.

त्यामुळेच क्रेडिट कार्डचं बिल आल्यावर वेळेत बिलाची पूर्ण रक्कम भरा. नाहीतर, तुमची बँक किंवा कंपनी तुम्हाला बिलाच्या रकमेचं ईएमआयमध्ये म्हणजे हफ्त्यात रुपांतर करून देते का ते तपासून घ्या.

ही सुविधा असल्यास क्रेडिट कार्डच्या बिलातील न भरलेल्या रकमेवरील व्याजदराचं ओझं निम्म्याहून अधिकनं कमी होतं.

4. क्रेडिट कार्डचे व्याजदर लक्षात घ्या

आपण क्रेडिट कार्डच्या बिलिंग चक्रानुसार आपल्या खरेदीचं नियोजन करू शकतो.

क्रेडिट कार्डचं बिल यायच्या दिवसापासून बिल भरायच्या दिवसापर्यंत जवळपास 40 ते 50 दिवसांचा कालावधी असतो. त्यामुळेच जर तुम्ही या बिलिंग चक्राच्या सुरुवातीच्या दिवसांतच क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी केली तर तुम्हाला व्याजमुक्त रक्कम वापरण्यास अधिक दिवस मिळतात.

त्याशिवाय, बँक किंवा कंपनी क्रेडिट कार्डच्या बिलाच्या रकमेवर किती व्याज आकारते आहे आणि बिलाचं उशीरा पेमेंट केल्यास किती शुल्क किंवा दंड आकारते आहे याची माहिती घेतली पाहिजे.

लक्षात घ्यायची सोपी गोष्ट म्हणजे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या क्रेडिट कार्डवरील व्याजदर, प्रोसेसिंग शुल्क आणि बिल उशीरा भरल्यास आकारलं जाणारं शुल्क खासगी बॅंका किंवा वित्तीय कंपन्यांच्या तुलनेत कमी असतात.

Getty Images 5. एअरपोर्ट लाउंज ऑफर्स आणि मोफत तिकिटं मिळवा

क्रेडिट कार्ड कंपन्या त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डबरोबर विविध सुविधा किंवा लाभ देखील देतात. यातील महत्त्वाचे म्हणजे एअरपोर्ट लाउंज आणि मोफत विमान तिकिटं.

आपल्या वापरानुसार काही विमानसेवा को-ब्रॅंडेड कंपन्या दरवर्षी दुसरं किंवा तिसरं देशांतर्गत प्रवासाचं विमान तिकीट मोफत देतात. याप्रकारच्या ऑफर्स तपासा.

देशांतर्गत उड्डाणांसाठी असणारी विमानतळं वर्षातून दोन ते सहा वेळा लाउंजची मोफत सुविधा पुरवतात. याव्यतिरिक्त, शॉपिंग कुपन्स मिळवण्यासाठी तुम्ही रिवॉर्ड पॉईंट्सचा वापरदेखील करू शकता.

6. जर तुम्हाला गरज नसेल तर फेकू नका

एकदा का तुम्ही क्रेडिट कार्ड घेतलं तर त्याचा वापर करणं महत्त्वाचं ठरतं. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या मार्गदर्शक तत्वांनुसार, जर एखादं क्रेडिट कार्ड वर्षभर वापरलं गेलं नाही तर ते निष्क्रिय केलं जातं.

त्यामुळे अगदी छोट्या रकमेसाठी का असेना, दोन किंवा तीन महिन्यांतून एकदा क्रेडिट कार्डचा वापर करा. त्यानंतर क्रेडिट कार्ड सर्व बिल लगेचच किंवा वेळेवर भरा. यामुळे ते क्रेडिट कार्ड सुरू राहील.

छोट्या रकमेसाठी क्रेडिट कार्डचा वापर करा आणि ते सुरू राहील याची काळजी घ्या.

जर तुम्ही दरवर्षी एका ठराविक रकमेपर्यंत क्रेडिट कार्डचा वापर केला नाही तर काही बँका त्यावर तुमच्यावर एक वार्षिक शुल्क देखील आकारतात. तुमच्या क्रेडिट कार्डच्या बाबतीत काय अट आहे हे तपासून घ्या.

जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत नसाल तर संबंधित कार्डच्या अॅपचा वापर करून स्वाइपिंग, देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय इत्यादी सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन थांबवा. यामुळे कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होईल.

अशा परिस्थितीत समजा चुकून तुमचं क्रेडिट कार्ड हरवलं तरी त्यामुळे होणारं नुकसान फारसं नसेल.

कर्जाच्या विळख्यात...

क्रेडिट कार्डचा आपण वापर करतो म्हणजे बँका किंवा वित्तीय कंपन्यांकडून तात्पुरत्या स्वरुपात कर्जाऊ रक्कम वापरण्यास घेतो. बँका किंवा वित्तीय कंपन्या व्यवसाय करत असतात. त्यामुळे तिथे दया किंवा सहानुभूतीला जागा नसते.

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही बँक किंवा कंपनीची रक्कम वापरलेली असते आणि तुम्हाला ती वेळेवर परत करायची असते. तसं झालं नाही तर बॅंक किंवा संबंधिक कंपनी तुमच्याकडून थकीत रकमेवर व्याज आकारते.

Getty Images

क्रेडिट कार्डच्या थकित रकमेवर आकारले जाणारे व्याजदर प्रचंड असतात. ते कमाल 36 ते 48 टक्क्यांपर्यंत असतात. याचाच अर्थ दर 100 रुपयांवर 3 ते 4 रुपयांचं व्याज आकारलं जातं.

याशिवाय, बिल वेळेवर भरलेलं नसल्यामुळे थकित बिलावरील शुल्क, कर आणि दंड देखील आकारले जातात आणि त्यासाठीची रक्कमदेखील अधिक असते.

ही सर्व रक्कम एकत्र जोडली जाते आणि तुम्ही वेळेवर बिल भरलं नाहीत, तर तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येतो.

जर तुम्ही पहिलंच क्रेडिट कार्ड वापरत असाल तर क्रेडिट स्कोअर खाली येण्याचा परिणाम खूपच गंभीर असतो. त्यामुळे भविष्यात तुम्हाला कोणत्याही स्वरुपाचं कर्ज मिळणं अधिक कठीण होतं.

पहिलं क्रेडिट कार्ड महत्त्वाचं

तुम्ही तुमच्या आयुष्यातील पहिलं क्रेडिट कार्ड कधीही घेतलेलं असो, तुमचं पहिलं क्रेडिट कार्ड हे तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीचा पाया असतं. कारण क्रेडिट हिस्ट्री जितकी जुनी तितकंच क्रेडिट प्रोफाइल मजबूत असतं.

अनेकांकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स असतात. अशावेळी जर तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करायचं असेल तर तुमचं पहिलं क्रेडिट कार्ड बंद करू नका. जर आवश्यकता असेल तर नंतर घेतलेलं नवं क्रेडिट कार्ड बंद करा.

Getty Images

तुमचं पहिलं क्रेडिट कार्ड किंवा तुम्ही घेतलेलं पहिलं कर्ज, तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीबाबत महत्त्वाची भूमिका बजावतात. तुमचा क्रेडिट रिपोर्ट त्याच्यावरच आधारलेला असतो.

जर पहिलं क्रेडिट कार्ड किंवा पहिल्या कर्जासंदर्भात काही अडचण असेल किंवा रेकॉर्ड चांगलं नसेल तर भविष्यात तुम्हाला गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा सोन्यावरील कर्ज घेताना अडचणी येऊ शकतात.

हे लक्षात ठेवा
  • बिल भरण्यासाठी रिमाईंडर लावून ठेवा. क्रेड (Cred)सारखी थर्ड पार्टी अॅप्स यामध्ये उपयुक्त ठरू शकतात का ते पाहा.
  • तुमच्या बिलाचं पेमेंट शक्यतो ऑटो मोडवर ठेवा. जर तुम्हाला ऑटो पेमेंट सुविधा लागू करता येत असेल तर तसं आवर्जून करा. कारण त्यामुळे तुम्हाला बिल वेळेवर भरण्याची चिंता राहणार नाही. काही संस्था किंवा बॅंका तुमच्या बॅंक खात्यातून बिलाची किमान रक्कम भरण्याची सुविधा पुरवतात तर काही बँका बिलाची पूर्ण रक्कम भरण्याची सुविधा देतात. त्यांचा वापर करा.
  • इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सुविधा वापरा. ऑटोमॅटिक पेमेंट क्लिअरन्स सिस्टम सेट करा.
  • बिल उशीरा भरणं टाळा आणि बिलाची किमान रक्कम भरण्याच्या ट्रॅपमध्ये अडकू नका.
  • क्रेडिट कार्डचा वापर आवश्यक असेल तेव्हाच करा.
  • तुमच्या खर्चाविषयी तुम्हाला पूर्ण स्पष्टता असली पाहिजे. तुम्ही कशावर, कधी, किती आणि का खर्च करत आहात याची तुमच्याकडे नोंद ठेवा.

(टिप: ही माहिती मार्गदर्शनासाठी आणि जागरुकता वाढवण्यासाठी दिली आहे. आर्थिक बाबींबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचं मार्गदर्शन घ्या)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.