सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागच्या महिन्यात साडेतीन हजार रुपयांचा असलेला कांद्याचा भाव आता १४०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. उत्पादन खर्च प्रतिकिलो १९ ते २२ रुपये येतो आणि सध्याचा कांद्याचा भाव प्रतिकिलो १४ रुपये आहे. शुक्रवारी (ता. १०) सोलापूर बाजार समितीत ४२० गाड्या कांद्याची आवक होती.
सोलापूर बाजार समितीत सोलापूरसह नगर, नाशिक, पुणे, लातूर, धाराशिव, सातारा व कर्नाटक (विजयपूर, कलबुर्गी) येथून कांदा विक्रीसाठी येत आहे. दरवर्षी मकर सक्रांतीनंतर कांद्याचे भाव कमी होतात, पण संक्रांत अजून काही दिवसांवर असतानाच कांद्याचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. १४ डिसेंबरमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ३५०० रुपयांचा भाव होता, मात्र आता तो १४०० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.
कांदा लागवडीपासून काढून बाजार समितीत विक्री करण्यापर्यंत एकरी एक लाखांहून अधिक रुपयांचा खर्च होतो, ही वस्तुस्थिती आहे. पण, सध्याच्या दरानुसार एकरातील उत्पादित कांद्यातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच शिल्लक राहत नसल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याचे दर कमी झाल्याने व केंद्र सरकारने निर्यातीवर २० टक्के शुल्क आकारल्याने कांदा निर्यात थांबली आहे. त्याचाही परिणाम भाव कमी होण्यावर झाला असल्याचे बाजार समितीतील अधिकारी सांगत आहेत.
शुक्रवारची सोलापुरातील आवक
एकूण गाड्यांची आवक
४२०
क्विंटलमध्ये आवक
४२,०७६
सरासरी भाव
१४०० रुपये
एकूण उलाढाल
५.८९ कोटी
कांद्याचा दर कितीही असू द्या, व्यापाऱ्यांकडून २० दिवसांनंतर पैसे
कांद्याचा दर सध्या खूपच कमी झाला असून अनेक शेतकऱ्यांना पदरमोड देखील करावी लागत असल्याचे चित्र आहे. बाजार समितीत शेतमाल विकल्यावर रोखीने बिल देणे अपेक्षित आहे. मात्र, पणन विभागाचे नियम पायदळी तुडवून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या मुदतीचा धनादेश दिला जातोय. त्यांना कितीही गरज असली तरीदेखील विकलेल्या कांद्याचे पैसे त्या मुदतीनंतरच मिळतात, अशी वस्तुस्थिती आहे. याकडे ना बाजार समितीच्या प्रशासकांचे ना जिल्हा उपनिबंधकांचे लक्ष, अशी सद्य:स्थिती आहे.