Nashik News : महापालिकेच्या उद्देशालाच हरताळ! पंचवटीतील गाळे वापराविना धूळखात
esakal January 11, 2025 07:45 PM

पंचवटी : महापालिकेने व्यावसायिकांसाठी पालिका बाजार व संकुलांची निर्मिती केली आहे. मात्र, पंचवटीतील पालिका बाजार व गाळे संकुलाला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक गाळे संकुल वापराविना धूळखात पडून आहेत. काही ठिकाणी अडगळ म्हणून वापर केला जात आहे. काही संकुलाची दुरवस्था झाली असून अस्वच्छतेचे साम्राज्य चित्र दिसून येत आहे. नारोशंकर मंदिराच्या समोरच्या बाजूला सुमारे वीस वर्षांपूर्वी उभारलेले गाळे संकुलात टपाल कार्यालय वगळता इतर सर्व गाळे पडून आहेत.

या संकुलाचा तळमजला हा खास पार्किंगसाठी सोडलेला आहे. मात्र, या पार्किंगमध्ये अतिक्रमण झालेले दिसते. यामुळे अस्ताव्यस्त ठेवलेले साहित्य पडलेले दिसते. याच पार्किंगच्या जागेत इतर वाहने पार्क केली जातात. तसेच कपड्यांचे गाठोड्यांचा ढिगारा येथे पडलेला असतो. येथे खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर गाळे काढलेले आहेत. यातील काही गाळ्यांचे शटर अर्धवट उघडे आहेत. काचेच्या खिडक्या फुटल्या आहेत.

दुसऱ्या मजल्यावर टपाल कार्यालयात येणाऱ्यांची वाहने पार्किंगच्या जागेत पार्क करणे अवघड होते व येथे येणाऱ्या नागरिकांचा त्याचा अडथळा पार करून जावे लागते. गंगाघाटाच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या या गाळे संकुलाच्या बाजूला म्हसोबा पटांगण असल्याने या भागात भाविक व पर्यटकांची वाहने थांबतात. त्यामुळे येथे अनेक व्यवसाय होऊ शकतील अशा उद्देशाने या गाळे संकुल उभारले असले तरी व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ते गाळे पडून आहेत व दुरवस्था झाली आहे.

पेठ रोडला पालिका बाजारही असाच रस्त्यालगतच्या भागात असूनही व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार व्यवसायास मर्यादा असल्यामुळे कमी दराचे भाडे असलेले गाळे मिळत नाहीत. गाळ्यांचे भाड्याचे दर परवडत नसल्यामुळे येथील व्यावसायिकांनी गाळे सोडून दिल्यामुळे हा बाजारही वापराविना पडून असल्याने तेथे अडगळीचे साहित्य टाकण्यात येत असल्याचे दिसते. नाग चौकातदेखील व्यापारी गाळे काढले आहेत. मात्र, या लगत असलेल्या वाघाडी नाल्यांची दुर्गंधी व गाळ्या समोर पडणारा नित्याचा कचरा यामुळे दोन - तीन गाळे वगळता बाकी पडून आहेत.

अडगळ म्हणून वापर

महापालिकेने निर्माण केलेले पालिका बाजार व गाळे संकुलात मोजकेच ठिकाणी वापर सुरू आहे. उर्वरित गाळे धुळखात पडून असल्याचे चित्र दिसत आहे. ज्यासाठी या गाळे संकुलाची उभारणी करण्यात आली त्याऐवजी अडगळीच्या वस्तू फेकण्यासाठीच गाळ्यांचा उपयोग होत असल्याचे दिसते. पंचवटी विभागात पालिका बाजार व गाळे संकुल पेठ रोड, दिंडोरी रोड, मालेगाव स्टॅन्ड, गोदाघाट नारोशंकर मंदिरासमोर, नाग चौक, हिरावाडी, वाघाडी संजयनगर, सिटी लिंक असे एकूण २४२ गाळे आहेत. यातील ११३ वापरात, १०७ रिक्त, ७ जप्त केलेले आहेत.

वापरात असलेल्या पालिका बाजार व गाळे संकुल या माध्यमातून आर्थिक वर्ष एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत ७८ लाख ६५ हजार २४२ रुपये महसूल प्राप्त झाला आहे. पंचवटी विभागात एकूण सहा प्रभाग आहेत. यातील प्रभाग तीन चार व पाच या प्रभागामध्ये नाशिक महापालिकेने पालिका बाजार व गाळे संकुल उभारली आहेत. यातील दत्ता मोगरे क्रीडा संकुल व सिटीलिंक बस डेपोजवळ काही वर्षापूर्वी गाळे काढण्यात आले आहेत. यातील प्रभाग क्रमांक चार व पाच मधील पालिका बाजार व गाळे संकुल दुरुस्ती गरज आहे.

नागरिक म्हणतात

- गाळा भाडे कमी असावी.

- रेडीरेकनर दर लावू नये.

- दुरुस्ती व्हावी.

- अतिक्रमण काढावे.

- काही संकुलाचे नूतनीकरण करावे.

- नियमित स्वच्छता व्हावी.

- त्यासाठी मनपा कर्मचारी नेमावेत

- धुळखात पडलेल्या गाळ्याचा पुन्हा लिलाव करावा.

- आजूबाजूच्या लोक वस्तीप्रमाणे भाडे आकारणी व्हावी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.