Ajintha Verul Film Festival : अजिंठा वेरूळ महोत्सव; समृद्ध करणारा अनुभव
esakal January 11, 2025 07:45 PM

दहावा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ ते १९ जानेवारीदरम्यान छत्रपती संभाजीनगरात होणार आहे. जगभरातील विविध देशांमधील, भारतातील विविध भाषांमधील सकस असे ६० हून अधिक चित्रपट यंदाच्या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगरात जागतिक दर्जाच्या चित्रपटांचा अवकाश यानिमित्ताने खुला होत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून मराठवाड्यातील सिनेरसिक नववर्षाची सुरवात दर्जेदार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सिनेमे पाहून करतात. यंदाचे वर्षदेखील त्याला अपवाद नाही. वर्षागणिक अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अधिकाधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण होत आहे. यंदाच्या महोत्सवात दाखविली जाणाऱ्या चित्रपटांची नावे पाहिली तर याची खात्री पटते.

प्रतिष्ठित कॅन, बर्लिन, व्हेनिस, टोरांटो चित्रपट महोत्सवात गाजलेले चित्रपट ते जगभरातील प्रादेशिक सिनेमे आणि माहितीपट प्रोझोन मॉल येथील पीव्हीआर-आयनॉक्स थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहेत. सिनेरसिक तर आवर्जून हजेरी लावतातच; परंतु महोत्सवाच्या दशकपूर्तीनिमित्त ‘काठावर’च्या प्रेक्षकांनीसुद्धा यंदा चित्रकुंभमेळाव्यात डुबकी मारून पाहावी.

या काठावरच्या प्रेक्षकांकडून विचारणा होत असते की, त्यांना महोत्सवात यायचे असते पण भाषेची अडचण वाटते. ऑस्कर विजेता कोरियन दिग्दर्शक बोंग जून-होच्या (पॅरासाइट) शब्दात सांगायचे तर, एकदा का तुम्ही सबटायटल्सचा एक इंच उंच अडथळा पार केला की, तुमच्यासाठी जगभरातील अनन्यसाधारण चित्रपटांचे अवकाश खुले होते. काय मिळते या अवकाशातून?

साठहून अधिक चित्रपट पाहण्याची संधी

महोत्सवात भारतीय चित्रपटांच्या मुख्य स्पर्धेव्यतिरिक्त फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, इंग्लंड, बेल्जीयम, नेदरलँड, बल्गेरिया, कॅनडा, फिनलँड, इराण, चीन, तिबेट, नेपाळ अशा वेगवेगळ्या देशांतील ६० पेक्षा जास्त चित्रपट दाखविले जाणार आहेत. यातील काही निवडक सिनेमांची माहिती घेऊ.

१) व्हिलेज रॉकस्टार्स २ (आसामी)

भारताकडून २०१८ साली ऑस्करला पाठविण्यात आलेल्या रिमा दास दिग्दर्शित ‘व्हिलेज रॉकस्टार्स’ सिनेमाचा दुसरा भाग यावेळी मुख्य स्पर्धेत आहे. पहिल्या चित्रपटात बालवयातील धुनूचे रॉकस्टार होण्याचे स्वप्न तिच्या कुमारवयात कोणकोणत्या आव्हानांना तोंड देत साकारू लागते, याची कहाणी या भागात पाहायला मिळणार आहे.

२) अंगम्मल (तमिळ)

प्रसिद्ध लेखक पेरूमल मुरुगन यांच्या कथेवर आधारित या चित्रपटात आई-मुलाच्या नात्यातून आधुनिक विरुद्ध पारंपरिक जीवनपद्धतीची मीमांसा केलेली आहे. शहरात स्थायिक झालेल्या डॉक्टर मुलगा गावात राहणाऱ्या आपल्या आईला साडीवर ब्लाऊज घालण्यास आग्रह करण्यावरून उद्भवलेला संघर्ष दिग्दर्शक विपिन राधाकृष्णन यांनी दाखविला आहे.

३) द सीड ऑफ द सेक्रेड फिग (इराण)

इराणमधील सरकारविरोधी आंदोलकांना जाचक तुरुंगवास आणि अनेकप्रसंगी फाशीची शिक्षा देण्यासाठी नियुक्त केलेल्या न्यायाधीशाची ही कथा. खुद्द सिनेमाचे दिग्दर्शक मोहम्मद रसौलोफ यांना इराणच्या कट्टरपंथी सरकारवर टीका केल्यामुळे आठ वर्षांची शिक्षा झालेली आहे. गेल्यावर्षी जीव वाचवून त्यांनी इराणमधून पलायन करून हा चित्रपट पूर्ण केला.

मान्यवरांना मानवंदना

राजकपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सिद्धार्थ काक दिग्दर्शित ''राज कपूर'' (१९८७) हा माहितीपट दाखविला जाणार आहे.

तसेच प्र. के. अत्रेंचा ‘श्यामची आई’ (१९५३) आणि नुकतेच निधन पावलेले श्याम बेनेगल यांचा ‘मंथन’ (१९८४) चित्रपटसुद्धा पाहण्याची संधी मिळणार आहे. पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी सई परांजपे दिग्दर्शित व झाकीर हुसैन अभिनीत साझ (१९९८) चित्रपटाचेही प्रदर्शन होणार आहे. तसेच भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला ‘कालिया मर्दन’ (१९१९) मूकपट लाईव्ह ऑर्केस्ट्रासह पाहता येणार आहे.

- मयूर देवकर

समृद्ध कलेची परंपरा

जागतिक सिनेमे वेगवेगळ्या देशांची संस्कृती, जीवनशैली आणि परंपरा समजून घेण्याची एक उत्तम संधी प्रदान करतात. त्या त्या देशांच्या इतिहास, दैनंदिन संघर्ष, आणि सध्याच्या सामाजिक मुद्यांचे अवलोकन होते. आपल्या नेहमीच्या चित्रपटांहून भिन्न, विविध प्रकारच्या कथा, दृश्यशैली आणि फिल्ममेकिंग तंत्रांचा वापर पाहून समृद्ध कलेचा अनुभव घेता येतो. यातून विचारशक्ती वृद्धिंगत होऊन जीवनाविषयी, कलेविषयी नवा दृष्टिकोन मिळतो. नवोदित सिनेत्सुक तरुणांना वेगळ्या धाटणीचे दिग्दर्शन, अभिनय, कॅमेरा वर्क, संपादन आणि संगीत याबद्दल नवीन गोष्टी शिकता येतात. तसेच, सोशल मीडियावरचे छोटे व्हिडिओ पाहून लक्ष केंद्रित करण्याची आपली क्षीण होत असलेली क्षमता यानिमित्ताने कदाचित थोडी बळकट होऊ शकते

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.