Devendra Fadnavis Reacts to Uddhav Thackerays Decision :स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट स्वतंत्र लढणार आहे. खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे गटाच्या या भूमिकेनंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंच्या स्वबळावर निवडणूक लढण्याच्या भूमिकेबाबतही विचारण्यात आलं.
यासंदर्भात बोलताना, ठाकरे गटाने एकत्रित लढावं किंवा वेगळ लढावं, याकडे आमचं लक्ष्य नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जनतेचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, आज संजय राऊत यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. मुंबईपासून नागपूरपर्यंत स्वबळावर लढायचं असं आमचं ठरतंय. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्षवाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी आमच्या भूमिका आहे, असं ते म्हणाले होते.