दौंड (पुणे) – महायुतीला विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळाले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर आता नेत्यांना आश्वासनांचा विसर पडत चालल्याचे दिसत आहे. महायुती सरकारचे अर्थमंत्री अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवरुन 360 अंशात घुमजाव केले आहे. लाडकी बहीण योजनेला निकष लावले जात असल्याची चर्चा सुरु असतानाच आता शेतकरी कर्जमाफीचा शब्द आम्ही दिलाच नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे. एकाच आठवड्यात अजित पवारांचे हे दुसरे चर्चेतील वक्तव्य आहे. दुसरीकडे अजित पवारांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा विचार करु, असे म्हटले आहे.
दौंड येथील लिंगाळी येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या 1 कोटी 15 लाख रुपये खर्चाच्या दोन मजली बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख माझ्या भाषणात कधी झाला का? असा उलट सवाल शेतकऱ्याला केला.
– Advertisement –
अजित पवार यांचे भाषण सुरु असताना सभेला उपस्थित एका शेतकऱ्याने कर्जमाफीचा विषय झेडला. त्यावर अजित पवार यांनी हा विषय हसण्यावर नेत तुम्ही माझ्या भाषणात कधी तरी कर्जमाफीचा विषय ऐकला का? मी निवडणुकीच्या काळात भाषणं केली त्यात लाडकी बहीण, मोफत वीज, अशाच योजनांचा उल्लेख होता. कर्जमाफीबद्दल मी कधी बोललो का? असा सवाल करत अजित पवार म्हणाले की, अंथरुण पाहून पाय पसरायचे असतात. सभा झाली की तु मला भेट मी माझी अडचण तुला सांगतो आणि मग तु तुझा सल्ला दे, असे म्हणत अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचाविषय टाळला.
दौंड येथील सभेतच अजित पवारांनी वीजबिल माफीला निकष लावण्याचे संकेत दिले आहेत. अजित पवार म्हणाले की मला गरजूंना वीजबिल माफी द्यायची आहे. अर्थसंकल्पात आम्ही 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतच्या शेतीपंपाचे वीजबिल माफीचा निर्णय घेतला आहे. यापुढेही वीजमाफी द्यायची आहे. परंतु जो इन्कम टॅक्स भरतो त्याला फुकट वीज देणे शक्य होणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी सरसकट वीजबिल माफीलाही निकष लावण्याचे संकेत दिले आहे.
– Advertisement –
अजित पवारांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा शेतकरी आणि मतदारांना नाराज करणारे वक्तव्य केले. गेल्या आठवड्यात परदेशात सुटी घालवून बारामतीत आल्यानंतर अजित पवार म्हणाले होते की, तुम्ही मला मत दिले म्हणजे माझे मालक नाही झाले. निवडणूक काळात बारामतीतीतल गावागावत जाऊन गेल्यावेळी ताईला निवडून दिलं आता दादाला निवडून द्या, अशी विनवणी अजित पवार करताना दिसत होते. विक्रमी बहुमत मिळाल्यानंतर त्यांची भाषा बदलली असल्याची मतदारसंघात चर्चा आहे.
हेही वाचा : Ajit Pawar : तुम्ही मला मत दिले, याचा अर्थ माझे मालक नाही झाला! अजित दादा असं का म्हणाले…