स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येत्या ३-४ महिन्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटातील काही खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. मात्र, हा दावा पक्षांनी प्रवक्त्यांनी खोडून काढला. याचदरम्यान, बारामतीतील एका कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री अजित आणि खासदार सुप्रिया सुळे एकत्र पाहायला मिळाले असून, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
बारामती तालुक्यातील अंजनगावात एका कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकत्र पाहायला मिळाले. महावितरणच्या उपकेंद्र उद्घाटनाप्रसंगी दोन्ही नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, यांना कार्यक्रमाचे निमंत्रण उशिरा दिल्यामुळे त्यांनी, सोशल माध्यमात ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.
अंजनगावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महावितरणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्र आणि उमाजी नाईक सभागृहाचे उद्घाटन पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे हे एकत्र आल्याचे पाहायला मिळालं. कार्यक्रमात आधी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. नंतर यांनी एन्ट्री केली. त्यानंतर या कार्यक्रमात महिलांनी अजित पवार यांचं औक्षण केलं. पुढे महावितरणच्या सभागृहाचे उद्घाटन पार पडलं.
मात्र, या कार्यक्रमाचं खासदार सुप्रिया सुळे यांना उशिरानं निमंत्रण देण्यात आलं होतं. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली असून, कार्यक्रमाबद्दल पूर्व माहिती देण्यात यावी, अशी नम्र विनंती देखील त्यांनी केली.
त्यांनी ट्विटमध्ये 'अंजनगावात कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ के. व्ही. उपकेंद्राचे उद्घाटन होतोय. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मला काही वेळापूर्वी मिळाली. मी स्वतः या भागाची लोकप्रतिनिधी आहे. येथील जनतेचे लोकसभेत प्रतिनिधित्व करते. त्यामुळे माझे दौरे आणि कार्यक्रम पुर्वनियोजित असतात. तरीही महत्त्वपूर्ण सार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजन किमान २४ तासांपूर्वी जरी केले आणि मला तशी कल्पना दिली तर, माझ्या कार्यक्रमात तसा बदल करता येणे शक्य आहे. संबंधित यंत्रणांनी याची कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती.' असं सुप्रिया सुळे यांनी लिखित तक्रार केली.