Ravindra Chavan: भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्यावर पक्षाची महत्वाची जबाबदारी; कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती
esakal January 12, 2025 02:45 AM

नवी दिल्ली : भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण याच्यावर पक्षानं महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबरीनं ते काम करणार आहेत.

रविंद्र चव्हाण यांची तात्काळ प्रभावानं भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं ते या क्षणापासूनच आपला कारभार हाती घेणार आहेत. यापूर्वीच चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार अशी चर्चा सुरु होती, पण अद्याप त्यांच्याकडं हे पद देण्यात आलेलं नाही.

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं सध्या महसूल मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळं पक्ष संघटनेतील पदावरुन त्यांना राजीनामा देणं क्रमपात्र आहे, त्यामुळे बावनकुळे यांची मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार अशी चर्चा सुरु झाली होती. सन २०२२ मध्ये बावनकुळे यांच्याकडं भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तीन वर्षासाठी ही नियुक्ती केली जाते. पण अद्यापही ते प्रदेशाध्यक्षपदी कायम आहेत.

चव्हाण यांच्या पुढील आव्हानं!

महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानं येत्या काळात पक्ष मजबुतीसाठी रविंद्र चव्हाण यांना काम करायचं आहे. पण यासाठी त्यांच्यापुढे अनेक आव्हानं असणार आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं पक्षाचा आलेख तर चढता आहेच.

पण आगामी काळात आता राज्यातील जवळपास सर्वच महापालिकांच्या निवडणुका देखील पार पडणार आहेत. त्यामुळं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यशाचं हे सातत्य राखण्याची जबाबदारी आणि त्यासाठी रणनिती तयार करण्याची जबाबदारी ही रविंद्र चव्हाण यांच्यावर असणार आहे. त्याचबरोबर महायुतीची धुराही भाजपला सांभाळायची असल्यानं त्यादृष्टीनं महत्वाची रणनीती आणि धोरणंही ठरवण्यात रविंद्र चव्हाण यांना काम करावं लागणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.