धाराशीव : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कडक शासन व्हावं यासाठी आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे. यासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. आजचा मोर्चा हा धाराशीवमध्ये पार पडला. यावेळी जरांगेंनी धाराशीवमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती देताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे.
...तर राज्य बंद पाडू - जरांगेजरांगे म्हणाले, संतोष देशमुखांबद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवर मोक्का लागलाय. पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोक्का लागला नसला तर आम्हाला हा मोक्का मान्य नाही. जितके आरोपी आहेत त्या सर्वांवर मोक्का लागला पाहिजे. कारण खंडणीतील आरोपी आणि खुनातील आरोपी दोन्ही एकच आहेत.
या सगळ्यांना ३०२ मध्ये घेतलं पाहिजे, मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आवाहन करतो की, सगळ्यांना ३०२ मध्ये घ्या. यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्याच क्षणाला बंद पाडणार आहोत, सोडणार नाही.
गृहमंत्री म्हणून तुमची छी थू करतो...परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोन्ही हत्यांबाबत गृहमंत्र्यांनी न्याय मिळवून दिला पाहिजे. जर या कुटुंबाशी तुम्ही दगाफटका केला तर तुमच्या सरकारचा कार्यक्रम संपलाच म्हणून समजा, असं जरांगे यावेळी म्हणाले. तसंच धाराशीवमध्ये आल्यानंतर मला आणखी एक माहिती मिळाली, "या धाराशीवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आहे.
मुख्यमंत्री तुम्ही जागे आहात काय? एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या लेकीवर जर अत्याचार होणार असेल तर गृहमंत्री म्हणून तुमची थू करतो आम्ही. या नीच लोकांना तुम्ही पोसता कसे? ही हरामखोरांची औलाद जर तीन वर्षांच्या लेकीबाळीवर बलात्कार करणार असेल तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुंकतो आम्ही" अशा कठोर शब्दांत जरांगेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.
दरम्यान, त्या बलात्कार करणाऱ्या पोराला, त्याच्या आईला आणि बापाला अटक का केली नाही, असा सवाल विचारताना "एसीपी साहेबांना मला हात जोडून विनंती आहे की, मी या प्रकरणात अद्याप घुसलो नाही. जर घुसलो तर बलात्कार करणाऱ्याला सोडणार नाही. त्याच्या आई-बापाला अटक करा.
मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावं. याचे नमुने संभाजीनगरच्या लॅबला गेलेत, त्या कुटुंबाला भीती आहे की यात काही फेरफार होतंय का? या नमुन्यात बदल नाही झाला पाहिजे. याला जन्मठेप झाली पाहिजे. हे जर सुटले तर व्यासपीठावर असलेल्या आमदारांच्या मागे मी लागेल, अशा शब्दांत जरांगेंनी आक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरील आमदारांना या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.