खारघर, ता. ११ (बातमीदार) : इस्कॉन मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून खारघरमध्ये उभारण्यात आलेल्या श्री श्री राधा मदनमोहन मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. ९ ते १५ जानेवारीदरम्यान उद्घाटन सोहळा रंगणार असून, बुधवारी (ता. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
खारघरमधील श्री श्री राधा मदनमोहन मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास सुरुवात झाली आहे. उद्घाटन सोहळ्यात कलश स्थापना, कीर्तन-प्रवचन, भजन संध्या, अभिषेक होणार आहे. रविवारी (ता. १२) शुभधा वराडकर यांचे नृत्य; तर कच्छी कोयल म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुजरात येथील गीता रबरी यांचे गीतगायन आणि लोकनाथ स्वामी यांचे प्रवचन होणार आहे. सोमवारी (ता. १३) सायंकाळी अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी श्रीकृष्ण जीवनावर आधारित नृत्य सादर करणार आहेत. मंगळवारी (ता. १४) ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा गीतगायनाचा कार्यक्रम; गुरुवारी (ता. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत श्री श्री राधा मदनमोहन मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात वैदिक महाविद्यालय, भक्तीवेदान्त वाचनालय, वैद्यकीय सेवालय, गोशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आश्रम, वैदिक वस्तुसंग्रहालय, कल्चरल सेंटर आदींचे उद्घाटन; तर आठ आचार्य आणि १० प्रमुख दैवतांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या वेळी वैदिक म्युझियम आणि कल्चरल सेंटरचे भूमिपूजन होणार असल्याचे एच. जी. सूरदास यांनी सांगितले.