मुंबई - लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीला एकत्रित सामोरे गेलेल्या महाविकास आघाडीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ‘एकला चलो रे’ चा नारा दिल्याने ही आघाडी विखुरण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकीमध्ये संधी मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी वेगळ्या निवडणुका लढविण्याचे संकेत दिले आहेत.
महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले असले तरी विधानसभा निवडणुकीत मात्र दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या पराभवाच्या आघातातून बाहेर न आलेल्या आघाडीतील काँग्रेस, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष हे स्वतंत्रपणे स्थानिक निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आमची ताकद आजमावायची आहे. तशाप्रकारची तयारी करण्याचे संकेत आम्हाला उद्धव ठाकरेंनी दिले असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
संजय राऊतांनी ‘एकला चलो रे’ च्या दिलेल्या या नाऱ्यावर आघाडीतील इतर पक्षांकडून प्रतिक्रिया उमटल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी देखील त्याची री ओढली आहे. त्या म्हणाल्या, ‘सर्व एकत्र असतानाही आम्ही महापालिकेच्या निवडणुका वेगवेगळ्याच लढत होतो. मागील महापालिकेची निवडणूक आम्ही वेगवेगळी लढलो होतो.
महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. सर्व निवडणुका जर सर्वजण आपआपल्या सोयीने लढवायलो लागलो तर कार्यकर्त्यांनी काय सतरंज्या उचलायच्या का? मग त्यांना न्याय कधी मिळणार? त्यामुळे महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यांना न्याय मिळायला हवा.’
वडेट्टीवारांची सावध भूमिका
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र याबाबत सावध भूमिका घेतली आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू, त्यांना महापालिका निवडणुका एकत्र लढण्याची विनंती करू असे मत त्यांनी मांडले. आमचे मत पटले नाही तर सर्वांना मार्ग मोकळा आहे. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्ष युती राहिलेली आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही पक्ष मिळून पुढे जाण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये मोठी चूक केली होती. आता ती त्यांना कळाली आहे. भाजप आणि देवेंद्रजींना बाजूला करून काँग्रेसच्या विचारांना त्यांनी साथ दिली होती. आता काँग्रेसचा विचार त्यांच्या अंगावर आला आहे. आतापर्यंत ज्या चुका झाल्या त्या आता त्यांच्या निदर्शनास आल्या आहेत. काँग्रेसच्या विचारावर उद्धव ठाकरेंची शिवसेना कधीच उभी राहू शकत नाही.
- चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष
लोकसभा अन् विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची आवश्यकता होती. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये संधी द्यायची असते. कार्यकर्त्यांना संधी देताना अडचणी निर्माण होत असतील तर स्वावलंबी व्हावे लागेल. स्वबळावर लढावे लागेल, संजय राऊत यांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे.
- अरविंद सावंत, ठाकरेंच्या पक्षाचे नेते