Sarpanch Murder Case : आरोपींवर 'मोक्का'चा बडगा; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर कारवाई़; विष्णू चाटे कोठडीत
esakal January 12, 2025 07:45 AM

बीड - मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण अन् हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’चे (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कलम लागू करण्यात आले आहे. खंडणी प्रकरणातील ‘सीआयडी’ कोठडी संपून न्यायालयीन कोठडीत असलेल्या विष्णू चाटेला ‘सीआयडी’ने खून प्रकरणात ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

संतोष देशमुख यांचे मागील वर्षी नऊ डिसेंबरला अपहरण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.

तपासात मस्साजोग येथीलच सिद्धार्थ सोनवणे याचाही गुन्ह्यातील सहभाग समोर आल्याने त्यालाही अटक झाली होती. या घटनेतील कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. दरम्यान क्रूरपणे हत्या आणि हत्येवरून माजलेले रणकंदन हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर ‘मोक्का’ नुसार कारवाई करून तपासासाठी विशेष पथकाची घोषणा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये केली होती.

गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष पथक या प्रकरणी तपास करत आहे. आता घटनेच्या महिनाभरानंतर खून प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’चे कलम लागू करण्यात आले आहे.

खंडणीप्रकरणी गुन्हा

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्यावर मस्साजोग (ता. केज) येथील आवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीसाठी धमकी देऊन दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंद झाला आहे. सुरवातीला त्याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. २३ दिवसांची सीआयडी कोठडी संपल्यानंतर त्याला शुक्रवारी (ता. १०) न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

सीआयडीने त्याला देशमुख खून प्रकरणात ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले होते. या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड देखील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कोठडीत असून या प्रकरणातील सुदर्शन घुले खून प्रकरणात कोठडीत आहे. कराडवरही ‘मोक्कां’तर्गत कारवाईची मागणी होते आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.