शिर्डी : ‘शिवशाही आपला आदर्श आहे. ज्या अपेक्षेने महाराष्ट्राने विधानसभा निवडणुकीत यश दिले आहे, ती अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आता युद्ध संपले आहे. विजय मिळाला आहे. या विजयाचे रूपांतर महाराष्ट्राचे सुराज्य करण्याची आपली जबाबदारी आहे. सत्तेचा उपयोग जनतेच्या समृद्धीसाठी व्हावा,’’ अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
भाजपच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गडकरी यांनी आगामी काळात महाराष्ट्राला अधिक विकसित करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोमाने काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. ते म्हणाले, की महाराष्ट्रात औद्योगिक, पर्यटकीय विकास करायचा आहे. महाराष्ट्र पुढे आला, तर हिंदुस्थान बदलेल. विविध राज्यांतील विकासाला पर्यटनाची जोड मिळत आहे. ते तीन पटींनी वाढले आहे. महाराष्ट्रात पंढरपूर, आळंदी, वेरूळ अशा स्थळांना देशाच्या दृष्टीने महत्त्व आहे, तसेच उद्योग, व्यवसायात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आता आपण जपानलाही मागे टाकले आहे.’’
शेतकरी कर्जमुक्त व्हावागडकरी म्हणाले, की जे काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या काळात झाले नाही, ते सर्व चांगले काम आपल्या काळात झाले पाहिजे. गडचिरोली जिल्हा हा सर्वांत मागास होता. गेल्या २५ वर्षांपासून आम्ही तेथे नियोजनपूर्वक काम केले. या जिल्ह्यात लोखंडाच्या खाणी सुरू झाल्या. दहा हजार लोकांच्या हाताला काम मिळाले. हजारो नक्षलवादी समाजाच्या प्रवाहात आणले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. सर्व तालुके विकसित झाले पाहिजेत. ठाणे, मुंबईत कोणी खुशीने येत नाहीत. मजबुरीने येतात. प्रत्येक गावाचा विकास झाला, तर लोक शहरात कशाला येतील?
देवेंद्र अभिमन्यू : बावनकुळे
‘विधानसभेत मिळविलेले यश हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आहे. असंख्य पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. सर्वांचे आभार मानण्यासाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाबाबत विश्वास होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे यश मिळविले. फडणवीस चक्रव्यूह भेदून बाहेर पडले. यश खेचून आणले. ते आधुनिक अभिमन्यू आहेत,’’ असे गौरवोदगार भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.
ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीतील निकालाने आम्ही काहीसे निराश झालो होतो. विरोधकांच्या खोट्या प्रचारामुळे निवडणुकीत नुकसान झाले. पण आम्ही धीर सोडला नाही. विधानसभेत मात्र आपण चांगले यश मिळविले. श्रद्धा आणि सबुरीवर आमचा विश्वास होता. विधानसभेला महायुतीला ४९ टक्के, तर भाजपला ५२ टक्के मते मिळाली. हा बदल सर्व कार्यकर्त्यांनी घडविला. आता आपले सरकार आले आहे. संघटन करून जनतेची कामे करायची आहेत. पुढील पाच वर्षांत १४ कोटी जनतेचा विकास करायचा, हा वचननामा आहे.
तो पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचायचे आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली. याच लाडक्या बहिणींनी विक्रम केला. आगामी काळात नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा अशा सर्व निवडणुकांत जोरदार तयारी करायची आहे. २०२५ हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचे वर्ष आहे. आम्ही सर्व लोकं तुम्हा सर्वांना सत्तेत आणण्याचे काम करणार आहोत. या सर्व संकल्पनांना आपण साथ द्यावी,’’ असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनास शिर्डीत शानदार प्रारंभ करण्यात आला. व्यासपीठ, मंडप, इतर सर्व व्यवस्था चोख करण्यात आली होती. अधिवेशनास ध्वजपूजनाने प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच पक्षाचे पदाधिकारी, आमदार उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने फडणवीस व पदाधिकाऱ्यांचे स्वागत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे आदींनी केले. याबरोबरच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, आमदार पंकजा मुंडे, मंत्री मुरलीधर मोहोळ, रावसाहेब दानवे, तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आभार मानले.
भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसविले : विखेप्रास्ताविकात राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे यश खेचून आणले. अहिल्यानगरला साईबाबांसारख्या महान संतांचा वारसा आहे. अहिल्यादेवींची ही जन्मभूमी आहे. आशिया खंडातील सर्वात प्रथम सहकारी साखर कारखाना काढलेल्या विठ्ठलराव विखे पाटील यांची ही भूमी आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना बहुमान मिळाला. त्यांच्यामुळेच आपला देश विश्वगुरू झाला. विधानसभा निवडणुकीत जे स्वतःला भावी मुख्यमंत्री समजत होते, त्यांना जनतेने घरी बसविले, असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला.