'यूपीआय'ची वाढती सुविधा
esakal January 13, 2025 01:45 PM

सुधाकर कुलकर्णी - सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी

युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’च्या माध्यमातून डिसेंबर २०२४ मध्ये १६.७३ अब्ज व्यवहार झाले व या व्यवहारांचे मूल्य २३.२५ लाख कोटी रुपये होते. नोव्हेंबरच्या तुलनेत व्यवहारसंख्या आणि मूल्य यातील वाढ लक्षणीय आहे. या वाढीचे प्रमुख कारण म्हणजे ‘एनपीसीआय’ (नॅशनल पेमेंट कॉर्पोशन ऑफ इंडिया) वेळोवेळी ‘यूपीआय’ सुविधेत करत असलेले सुधारणा हे आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून ‘यूपीआय’ अधिकाधिक सुलभ आणि व्यापक करण्यावर भर दिला जात आहे, त्यामुळे त्याचा वापर वाढत आहे. अलीकडेच ‘यूपीआय’मध्ये एक महत्त्वपूर्ण सुधारणा एक जानेवारी २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. आता ग्राहक कोणतेही वॉलेट (उदा. पेटीएम/मोबीक्विक/फ्रीचार्ज आदी.) ‘यूपीआय’ अॅपला (उदा. भीम, गुगलपे, फोनपे) जोडू शकतात आणि त्याद्वारे पेमेंट करू शकतात.

‘यूपीआय’- वॉलेट सुविधा

यापूर्वी फक्त वॉलेट ते वॉलेटच पेमेंट करता येत होते. उदा. आपल्याकडे मोबिक्विक वॉलेट असेल, तर ज्याच्याकडे मोबिक्विक वॉलेट आहे, त्यालाच पेमेंट करता येत असे किंवा त्याच्याकडूनच पेमेंट घेता येत असे. पेमेंट करणाऱ्याकडे पेटीएम वॉलेट असेल आणि ज्याला पेमेंट करावयाचे त्याच्याकडे मोबिक्विक वॉलेट असेल, तर दोन भिन्न वॉलेटमध्ये व्यवहार करता येत नव्हते. मात्र, आता आपले कोणतेही वॉलेट आपल्याकडे असलेल्या कोणत्याही ‘यूपीआय’ अॅपला लिंक करून वॉलेटमधील शिल्लक रकमेपर्यंत कोणतेही पेमेंट ‘यूपीआय’अॅपद्वारे करता येणार आहे.

यामुळे सर्व वॉलेटना इंटरपोर्टिबिलिटी मिळणार आहे. यामुळे वॉलेट वापरला चालना मिळेल आणि किरकोळ रकमांचे आर्थिक व्यवहारदेखील ‘यूपीआय’द्वारा आणि पर्यायाने बँकिंग सिस्टीममधूनच होतील व रोखीच्या व्यवहारांचे प्रमाण आणखी कमी होण्यास चालना मिळू शकेल.

डिजिटल व्यवहारांना चालना

सर्व प्रकारच्या वॉलेटला ‘पीपीआय’ (प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स) असे म्हणतात. अशी ‘पीपीआय’ वॉलेटची सेवा पेटीएम, मोबिक्विक/फ्रीचार्ज यांसारख्या फिनटेक कंपन्याकडून दिली जातात. याला ई-वॉलेट किंवा डिजिटल वॉलेट असेही म्हणतात. अशी वॉलेट प्रीपेड म्हणजे यात आधी रक्कम वर्ग करावी लागते आणि शिल्लक रकमेपर्यंतच पेमेंट करता येते. असे वॉलेट ‘यूपीआय’ अॅपला लिंक करण्यासाठी ‘केवायसी’ची पूर्तता करणे गरजेचे आहे.

त्याची खात्री करूनच वॉलेट सुविधा देणाऱ्या कंपनीने परवानगी दिल्यावरच ते वॉलेट ‘यूपीआय’ला जोडले जाईल. ‘पीपीआय’ वॉलेट इंटरपोर्टेबल झाल्याने ते ‘यूपीआय’ला जोडून आर्थिक व्यवहार करण्याचे प्रमाण वाढेल आणि डिजिटल व्यवहारांना आणखी चालना मिळेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.