भारतीय परंपरेत कुंभमेळ्याला वेगळंच महत्त्व आहे. कुंभमेळ्याला ज्या प्रचंड संख्येनं भाविक गोळा होतात, तितक्या संख्येनं पृथ्वीवर क्वचितच दुसऱ्या कोणत्या धार्मिक बाबीसाठी माणसं गोळा होत असावीत असं म्हटलं जातं.
यंदाचा प्रयागराज इथं होतो आहे. कुंभमेळ्याची तयारी कशी सुरू आहे, तिथे काय काय व्यवस्था करण्यात आली आहे, याशिवाय कुंभमेळा कधी सुरू झाला, त्याचे ऐतिहासिक संदर्भ कोणते याची माहिती देणारा हा लेख.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये लवकरच महा कुंभमेळ्याची सुरुवात होणार आहे. थंडीमुळे तिथे सध्या जवळपास 10 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. दिवसभर धुकं पसरलेलं असतं. अगदी दुपारच्या वेळेत सुद्धा सूर्याचं दर्शन होत नाही.
मात्र तिथे भाविक मोठ्या संख्येनं येत आहेत. भाविक त्रिवेणी संगमाला भेट देत आहेत आणि गंगेत स्थान करत आहेत.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, प्रयागराजमध्ये जिथे महा कुंभमेळा होणार आहे, तिथे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी बंधनं घातली आहेत.
BBC प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर स्नान करताना भाविकत्रिवेणी संगम घाट, हनुमान मंदिर कॉरिडॉर, सरस्वती घाट आणि अरेल घाटकडे जाणाऱ्या मार्गांवर बंधनं घालण्यात आली आहेत.
कुंभमेळ्यात 40 कोटी लोक येण्याचा अंदाजउत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की यावर्षी कुंभमेळ्यात देशाच्या विविध भागांबरोबरच 123 देशांमधून 40 कोटी लोक येण्याचा अंदाज आहे.
याआधी 2013 मध्ये झालेल्या कुंभमेळ्याला जवळपास 20 कोटी लोक आले होते, असा उत्तर प्रदेश सरकारचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी म्हणून केशव प्रसाद मौर्य यांनी महिनाभराआधीच आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या दक्षिणेतील राज्यांचा दौरा केला होता. तिथे त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या होत्या आणि भाविकांनी कुंभमेळ्याला यावं यासाठी प्रचार केला होता.
Getty Images 13 जानेवारीला, पौष महिन्यातील पौर्णिमेला कुंभमेळ्याची सुरुवात होते आहे आणि तो 45 दिवस चालणार आहेत्यांनी बीबीसीला सांगितलं की, "याआधी आम्ही कुंभमेळ्यावर 4,700 कोटी रुपये खर्च केले होते. आता आधीच्या योजनेनुसार, कुंभमेळ्यासाठी 6,500 कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे. कुंभमेळ्यासाठी निधीची कोणतीही अडचण नाही. केंद्र सरकारदेखील यासाठी निधी उपलब्ध करून देतं आहे."
संत, साधू आधीच कुंभमेळ्यात पोहोचले आहेत आणि ते आखाड्यामध्ये राहत आहेत.
BBC BBC कुंभमेळ्याची सुरुवात कधी होते आहे?कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो. याआधीचा कुंभमेळा 2013 मध्ये झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये अर्ध कुंभमेळा झाला होता.
अर्ध कुंभमेळा दर सहा वर्षांनी होतो.
यावेळेस कुंभमेळ्याची सुरुवात 13 जानेवारीपासून होते आहे. हा पौष महिन्यातील पौर्णिमेचा दिवस आहे. कुंभमेळा एकूण 45 दिवस चालणार आहे.
26 फेब्रुवारीला महा शिवरात्रीला कुंभमेळ्याची सांगता होईल. या 45 दिवसांमध्ये 6 दिवसांनी भाविक अतिशय विशेष किंवा महत्त्वाचे मानतात.
या दिवसांमध्ये त्रिवेणी संगमावर शाहीस्थान करण्यासाठी लाखो भाविक येण्याचा अंदाज आहे.
सर्वसामान्य भाविकांबरोबरच, व्हीआयपी, नागा साधू, इतर संत-साधू, कल्पवासी (जे महिनाभर दीक्षा घेतात), पिठाधिपती आणि मठाधिपती कुंभमेळ्यात येतील.
Getty Images कुंभमेळ्याची सुरुवात कधी झाली?अनामिका रॉय अलाहाबाद विद्यापीठात 'प्राचीन इतिहास' या विषयाच्या प्राध्यापक आहेत आणि विद्यापीठाच्या कला विभागाच्या अधिष्ठाता किंवा डीन आहेत. त्या म्हणाल्या, ऐतिहासिक पुराव्यांनुसार, कुंभमेळ्याची सुरुवात सम्राट हर्षवर्धनच्या राजवटीत झाली होती.
यासंदर्भात त्या बीबीसीशी बोलल्या.
"चिनी प्रवासी हयुएन त्सांग याच्या म्हणण्यानुसार, सम्राट हर्षवर्धन यांच्या राजवटीत दर पाच वर्षांनी कुंभमेळ्यासारख्याच एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असे. जेव्हा या प्रकारचा मेळा किंवा कार्यक्रम दर पाच वर्षांनी इथं भरवला जायचा, तेव्हा हर्षवर्धन प्रयागला यायचे."
"तसंच कवी आणि अध्यात्माच्या मार्गावर चालणारे साधक यायचे. हर्षवर्धन त्यांना भिक्षा द्यायचे किंवा दान करायचे. कुंभमेळ्यासंदर्भातील हा पहिला ऐतिहासिक संदर्भ आहे," असं त्या म्हणाल्या.
त्यांनी पुढे सांगितलं की हर्षवर्धनच्या राजवटीच्या आधी गुप्त काळात कुंभमेळा झाल्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत.
BBC अनामिका रॉय अलाहाबाद विद्यापीठात प्राचीन इतिहास या विषयाच्या प्राध्यापक आहेत"आमच्यासारखे इतिहासकार फक्त पुराव्यांच्या आधारेच बोलतात. गुप्तकाळात कुंभमेळ्याचं आयोजन झाल्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे कुठेही सापडलेले नाहीत. आतापर्यंत जे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध झाले आहेत, ते लक्षात घेता हर्षवर्धनच्या राजवटीत आणि नंतर शंकराचार्यांच्या काळात कुंभमेळा झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत," असं त्या म्हणाल्या.
अनामिका रॉय यांनी बीबीसीला सांगितलं की शंकराचार्यांच्या काळात कुंभमेळा झाल्याचे स्पष्ट पुरावे नसले तरी 'कुंभ तिथ्यादि निर्वाण' या स्वामी करपात्री यांनी लिहिलेल्या पुस्तकात तसा उल्लेख आहे.
"कुंभमेळ्याच्या बाबतीत शंकराचार्यांनी खगोलीय स्थिती म्हणजे ग्रह ताऱ्यांच्या स्थिती लक्षात घेतली होती. दर 12 वर्षांनी जेव्हा सर्व तारे एका रेषेत येतात तेव्हा शंकराचार्यांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं होतं. त्या अनुषंगानं असं म्हणता येईल की कुंभमेळ्याचा इतिहासाशी संबंध आहे," असं त्या पुढे म्हणाल्या.
कुंभमेळ्यासंदर्भातील इतर कथा काय सांगतात?तेलगू पुजारी यादवेल्ली चंद्रशेखरा प्रवीण शर्मा यांनी बीबीसीला, या 4 ठिकाणी कुंभमेळा का भरतो याबद्दल सांगितलं.
ते गेल्या 12 वर्षांपासून प्रयागराजमध्ये पुजारी म्हणून काम करत आहेत.
ते म्हणाले की चार ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन करण्याबाबत पुराणात वेगवेगळ्या कथा सांगण्यात आल्या आहेत.
BBC कुंभमेळा 4 ठिकाणी का होतो, याची माहिती तेलगू पुजारी यादवेल्ली चंद्रशेखरा प्रवीण शर्मा यांनी दिलीते म्हणाले, "साम आणि अथर्व वेदात म्हटल्यानुसार देव आणि दानव किंवा राक्षसांनी जेव्हा समुद्र मंथन केलं, तेव्हा त्यातून एक अमृत कुंभ म्हणजे अमृत असलेलं भांडं बाहेर आलं. मग जयंत नावाच्या एक कावळ्यानं ते तोंडात धरून पृथ्वीला प्रदक्षिणा घातली."
"या अमृत कलश किंवा अमृत कुंभामधून एक एक थेंब प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी पडले. त्यामुळेच ही चार ठिकाणं अत्यंत खास किंवा महत्त्वाची आहेत," असं प्रवीण शर्मा म्हणाले.
कुंभमेळा दर 12 वर्षांनी का होतो?चंद्रशेखर प्रवीण शर्मा यांनी दर 12 वर्षांनी कुंभमेळा का होतो यामागचं कारण सांगितलं.
ते म्हणाले, आमच्यासाठी दिवस 24 तासांचा असतो. मात्र देवांसाठी एक दिवस एक वर्षाएवढा असतो. पुराणात म्हटल्याप्रमाणे, पक्षानं 12 दिवसात पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. त्यामुळेच दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन करण्याची प्रथा पडली आहे."
Getty Images गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर कुंभमेळा होतोगंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर कुंभमेळा भरतो. त्यात गंगा आणि यमुना या दोन नद्या आपल्याला प्रत्यक्ष समोर दिसतात. तर विद्वानांचे म्हणणं आहे ती तिसरी नदी म्हणजे सरस्वती नदीचा प्रवाह जमिनीखालून वाहतो.
यंदाच्या कुंभमेळ्यासाठी काय तयारी करण्यात आली आहे?प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी त्रिवेणी संगमावर एक खास घाट तयार करून देण्यात आला आहे. त्या घाटावर जाण्यासाठी जवळपास तीन ते चार किलोमीटर्सचं अंतर पार करावं लागतं.
त्रिवेणी संगमाच्या परिसरात आंघोळ केल्यानंतर भाविकांना कपडे बदलता यावेत यासाठी उत्तर प्रदेश सरकार 'फ्लोटिंग चेंजिंग रुम्स' म्हणजे कपडे बदलण्यासाठी तरंगत्या खोल्या उभारतं आहे.
"सर्वसामान्य भाविक आणि व्हीआयपी यांच्यासाठी आम्ही 12 जेटींवर चेंजिंग रूम बांधत आहोत. भाविक त्या जेटी पर्यंत जाऊ शकतात, तिथून पायऱ्यांनी उतरून नदीत जाऊ शकतात, आंघोळ करून वर येऊन नंतर त्यांचे कपडे बदलू शकतात," असं यश अगरवाल म्हणाले. ते दास अँड कुमार या कंपनीत भागीदार आहेत. हीच कंपनी चेंजिंग रूम उभारते आहे.
BBC त्रिवेणी संगमाच्या परिसरात भाविकांना कपडे बदलता यावे यासाठी 'तरंगत्या चेंजिंग रुम'ची व्यवस्थायाव्यतिरिक्त, उत्तर प्रदेश सरकारनं नदीच्या संगमाच्या ठिकाणी नदीकाठावर तात्पुरत्या स्वरूपाच्या चेंजिंग रूम देखील उभारल्या आहेत.
कुंभमेळा होत असलेल्या परिसरात नदीपात्राचं सपाटीकरण करण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर तरंगते पूल बांधण्याचं काम देखील सुरू आहे.
गेल्या वेळच्या कुंभमेळ्यात 22 तरंगते पूल बांधण्यात आले होते. तर यंदाच्या कुंभमेळ्यासाठी 30 तरंगते पूल बांधले जात आहेत. कुंभमेळ्याच्या आयोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की पूल बांधण्यासाठी 3,308 पॉंटूनचा वापर करण्यात येतो आहे.
पाँटून म्हणजे धातूपासून बनलेले आधार किंवा सपाट बोट ज्यांचा वापर करून त्यावर हे तात्पुरत्या स्वरूपाचे तरंगते पूल बांधले जातात.
या तरंगत्या पुलाचा वापर फक्त पादचारी लोकच करू शकतात असं नाही, तर 5 टनांपर्यंत वजन असणारी वाहनं देखील या पुलावरून जाऊ शकतात.
वाळूत वाहनं अडकू नयेत यासाठी 2.69 लाख लोखंडी फ्रेमउत्तर प्रदेश सरकार कुंभमेळ्यासाठी एकूण 488 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधतं आहे.
यातील काही रस्ते किंवा मार्ग नदीपात्रातच तयार करण्यात आले आहेत. या नदीपात्रातील रस्त्यांमध्ये किंवा नदीकाठच्या वाळूत वाहनं अडकू नयेत यासाठी 2.69 लाख लोखंडी पत्रे किंवा प्लेट्स (चेकर्ड प्लेट्स) टाकण्यात आले आहेत.
नदीपात्रात सपाटीकरण करण्याचं आणि नदीत वाळूच्या पिशव्या टाकण्याचं काम सुरू आहे. जेसीबीसारख्या उपकरणांचा वापर करून वाळू उचलण्याचं आणि टाकण्याचं काम सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू आहे.
कुंभमेळ्याच्या परिसरातील टेंट सिटी (तंबूंचं शहर) मध्ये तंबूंची उभारणी करण्याचं सुरू असून ते अद्याप पूर्ण झालेलं नाही.
Getty Images उत्तर प्रदेश सरकार कुंभमेळ्यासाठी काही रस्ते किंवा मार्ग नदीपात्रातच तयार करण्यात आले आहेत.कुंभमेळाच्या आयोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी त्रिवेणी संगमाच्या परिसरात 4,000 हेक्टर जागेवर व्यवस्था केली आहे.
कुंभमेळ्याचे अतिरिक्त अधिकारी विवेक चतुर्वेदी बीबीसीला म्हणाले की विविध काम, व्यवस्थेसाठी पारंपारिक पद्धतीनं जमिनीचं वाटप करण्यात आलं आहे.
"आम्ही चार हजार हेक्टर जमीनचं सपाटीकरण केलं आहे. तसंच आखाडा, दांडीवाडा, आचार्यवाडा, शंकराचार्य, महामंडलेश्वर यांच्यासह विविध संस्थांसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सरकारकडून आम्ही कुंभमेळ्याच्या ठिकाणी तंबू, पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत," असं विवेक चतुर्वेदी पुढे म्हणाले.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की 1850 हेक्टर जागेवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तंबूत राहण्यासाठी 1.10 लाख रुपये प्रतिदिन2019 मध्ये अर्ध कुंभमेळा झाला होता. त्यात 80,000 तंबू उभारण्यात आले होते. या कुंभमेळ्यासाठी 1.60 लाख तंबूंची व्यवस्था करण्यात येते आहे.
भाविकांसाठी टेंट सिटीमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे तंबू उभारले जात आहेत.
उत्तर प्रदेश पर्यटन विभाग आणि आयआरसीटीसीसह 11 खासगी संस्था तंबू उभारण्याचं काम करत आहेत.
भाविकांना कुंभमेळ्यात राहण्यासाठी म्हणून पर्यटन विभाग डॉर्मिटरी, डबल बेडरुम व्हिला, सिंगल बेडरुम, महाराजा कॉटेज इत्यादी नावानं राहण्याची सुविधा देत असून त्यासाठी बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
BBC आखाड्यात उभारण्यात येत असलेले काही तंबू पेंढ्याचा वापर करून पारंपारिक पद्धतीनं बांधले जात आहेतअधिकाऱ्यांनी सांगितलं की यामध्ये बेड, रूमशी संलग्न बाथरुम, सोफा किंवा खुर्ची आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विविध आखाड्यांमध्ये उभारण्यात येत असलेले काही तंबू पेंढ्याचा किंवा गवताचा वापर करून पारंपारिक पद्धतीनं बांधले जात आहेत.
इथे राहण्यासाठी विविध प्रकारचे तंबू उपलब्ध असून त्यांचं भांडं 1,500 रुपये प्रतिदिनापासून ते 1.10 लाख रुपये प्रतिदिन इतकं आहे.
डोम सिटी नावानं उभारल्या जाणाऱ्या परिसरात 1.10 लाख रुपये प्रतिदिन भाडं असलेले तंबू उभारले जात आहेत.
पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की यासंदर्भातील अधिक माहिती तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल.
गंगा नदीची साफसफाई करणं कठीण काम!कुंभमेळ्याची सुरुवात होण्यापूर्वी यमुना आणि गंगा नदीमध्ये कचरा आणि इतर घाण दिसते आहे. भाविकांनी टाकलेली फुलं आणि पूजा केल्यानंतरचा इतर कचरा त्रिवेणी संगम घाटावर नदीत पडलेला दिसतो.
सफाई कर्मचारी नदीमध्ये सफाई करताना दिसले. विवेक चतुर्वेदी म्हणाले की नदीमध्ये कचरा जाऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते आहे.
ते पुढे म्हणाले की, नदी स्वच्छ करण्यासाठी आणि सफाई करण्यासाठी एनजीटीच्या सूचनांनुसार सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
BBC कुंभमेळ्याची सुरुवात होण्यापूर्वी यमुना आणि गंगा नदीमध्ये कचरा आणि इतर घाण दिसते आहे.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नदीची साफसफाई करण्यासाठी सर्व प्रकारची पावलं उचलण्यात आल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "यंदाच्या कुंभमेळ्याला आम्ही दिव्य-भव्य-डिजिटल कुंभमेळा म्हणत आहोत. आम्ही 1.50 लाख शौचालयं उभारत आहोत. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पर्यावरणाचं संरक्षण करण्याबरोबरच एकदाच होणारा प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आम्ही पावलं उचलणार आहोत. या कुंभमेळ्यासाठी आम्ही 11 भाषांमध्ये चॅट बोट उपलब्ध करून देणार आहोत."
ड्रोनचा वापर करून कुंभमेळ्याची निगराणीकुंभमेळ्याचे अतिरिक्त अधिकारी विवेक चतुर्वेदी बीबीसीला म्हणाले की कुंभमेळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी 50,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
"आम्ही आर्टिफिशयल इंटेलिजन्सवर आधारित 2,700 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कमांड कंट्रोल सेंटरला जोडण्यात आले आहेत. यांच्या मदतीनं आम्ही भाविकांच्या आणि कुंभमेळ्याच्या सर्व ठिकाणांवर होणाऱ्या हालचालींवर सातत्यानं लक्ष ठेवून आहोत," असं ते म्हणाले.
कुंभमेळ्यासाठीचे अधिकारी म्हणाले की पाण्यात चालणाऱ्या ड्रोनचा वापर करून देखील ते परिसरावर लक्ष ठेवून आहेत. हे ड्रोन पाण्यात शंभर मीटर खोलीपर्यंत जाऊ शकतात.
तरंगत्या पुलांवर सुरक्षेसाठी पोलिसांची मोठी गस्त आहे. हे सर्व तरंगते पूल वन-वे आहेत. त्यामुळे पोलीस वाहनांना एकाच बाजूनं जाऊ देत आहेत.
BBC कुंभमेळ्याचे अतिरिक्त अधीक्षक विवेक चतुर्वेदी म्हणाले की कुंभमेळ्यात सुरक्षा व्यवस्थेसाठी 50,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेतगेल्या वर्षभरात नद्यांच्या संगमाकडे जाणाऱ्या रस्त्यांचं रुंदीकरण करण्यात आलं असल्याचं
अधिकारी जरी असं म्हणत असले, तरी त्या परिसरात अजूनही वाहतूक कोंडीची गंभीर समस्या आहे.
अरुंद रस्त्यांमुळे त्या परिसरातील वाहतूक ठप्प होते आहे आणि वाहनांना तिथून जाताना अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे.
प्रयागराजच्या रहिवाशांचं म्हणणं आहे की कुंभमेळ्याच्या काळात ही समस्या आणखी गंभीर रुप धारण करू शकते.
"कुंभमेळ्याच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या एकूण 5 ते 6 हजार बस असतील. लोकांच्या दळणवळणासाठी किंवा वाहतुकीसाठी कोणतीही समस्या येणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. त्याचबरोबर विमानतळावरील नवं टर्मिनल लवकरच सुरू होईल. या परिसरात आम्ही एकूण 67 हजार एलईडी लाईट बसवत आहोत," अशी माहिती विवेक चतुर्वेदी यांनी बीबीसीला दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)