धाराशिव: उमरगा विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीतील पराभूत उमेदवार माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रवीण स्वामी यांच्याविरुद्ध ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर फेब्रुवारी मध्ये सुनावणी होणार आहे. या संदर्भात प्रथमतः ज्ञानराज चौगुले यांनी जात पडताळणी समिती धाराशिव यांच्याकडं रीतसर तक्रार दाखल केली होती. परंतू समितीने सदर प्रकरणी सुनावणी घेण्याचे अधिकार समितीस नसल्याचे कारण देत सदर तक्रार फेटाळली होती. त्यानंतर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ज्ञानराज चौगुले यांच्या या याचिकेवर उच्च न्यायालयात फेब्रुवारी महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून प्रवीण स्वामी यांना तशी नोटीस बजावण्यात आली आहे.
प्रवीण स्वामी यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्ञानराज चौगुले यांचा निसटता पराभव केला होता. उमरगा विधानसभा मतदारसंघात प्रवीण स्वामी यांना 94,550 मते मिळाली होती. तर ज्ञानराज चौगुले यांना 91142 मते मिळाली होती. ज्ञानराज चौगुले या मतदारसंघातील तीन टर्मचे आमदार होते. त्यामुळे प्रवीण स्वामी यांनी निसटता विजय मिळवल्याची चुटपूट ज्ञानराज चौगुले यांना लागून राहिली होती. त्यामुळे माजी आमदार चौगुले यांनी कोर्टात धाव घेतली आहे. यामुळे आता प्रवीण स्वामी यांच्या आमदारकीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. आता प्रवीण स्वामी कोर्टात कशाप्रकारे आपली बाजू मांडतात, हे पाहावे लागेल.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसला होता. लोकसभा निवडणुकीतही धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांना या लोकसभा मतदारसंघात प्रचंड मोठा लीड मिळाला होता. त्यानंतर उमरगा विधानसभा मतदारसंघातही ज्ञानराज चौगुले यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
आणखी वाचा
धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण